'बाहेर नका जाऊ, बाहेर कोरोना आहे, पप्पा तुम्ही बाहेर जाऊ नका, इथं बसा' -
'बाप' माणूस असलेला पोलीस कर्मचारी आपली खाकी परिधान करून कर्तव्यावर जात असताना 'बाहेर नका जाऊ, बाहेर कोरोना आहे, पप्पा तुम्ही बाहेर जाऊ नका, इथं बसा' असं म्हणत तो चिमुरडा आर्त हाक मारत धाय मोकलून रडत आहे. ड्युटीवर चाललेला बाप मात्र त्याला समजावत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्या निष्पाप बालकाला कोण समजावणार की 'कर्तव्य सर्व श्रेष्ठ असते' असा संदेश या व्हिडीओसोबत व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, डॉक्टरांना मदत करणारे मदतनीस, पोलीस कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणारे सर्वच कर्मचारी हे जीव धोक्यात घालून मात्र तेवढीच काळजी घेत आपापले कर्तव्य बजावत आहेत. याच कर्मचाऱ्यांना सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील रविवारी टाळ्या आणि थाळीनाद करून या कर्मचाऱ्यांचे आभार मानावेत असा संदेश दिला होता.
Coronavirus | मुंबईत चार तर सांगलीत पाच कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 116 वर
या संचारबंदीत पोलीस विभाग 24 तास खडा पहारा देत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर दिले आहेत. मदतीच्या भावनेसोबतच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना आपल्या दंडुक्याने ते समज देखील देत आहेत.
खाकीतले देव
कोरोनाच्या लढाईत राज्यातील पोलिस प्रशासन सतर्क आहे. तसेच घाबरलेल्या लोकांना धीर देण्याचं काम देखील ते करत आहेत. काही जिल्हा पोलिस यंत्रणांनी जीवनावश्यक सेवा घरपोच देण्याचं सांगत हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला दंडुकशाही दाखवणारे हे पोलीस किती भावनिक आहेत याचं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाहायला मिळालं. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांवर आलेली उपासमारी दूर करण्यासाठी निगडी पोलिसांनी पुढाकार घेतला. त्यांनी अण्णा भाऊ साठे नगरमध्ये किराणा मालाचे वाटप केले.