भिवंडी : भिवंडीतील नारपोली पोलीस स्टेशनच्या काल्हेर पोलीस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी सागर भोईर विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. आज सागर भोईरला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्याला 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस नाईकाचं नाव किशोर जानराव थोरात आहे.  काल्हेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या 38 वर्षीय किशोर थोरातांना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मारहाण झाली. चौकीत ड्यूडीवर असताना केवणीदिवा गावातील सराईत गुन्हेगार सागर उर्फ गाग्या गोरख भोईर हा पोलीस चौकीत घुसला आणि पोलीस नाईक थोरात यांना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर थोरातांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना खाली पाडत 20 मिनिटं जबर मारहाण केली. तसंच त्यांच्या जवळील वॉकीटॉकीची तोडफोड करण्यात आली आहे.

या मारहाणीत थोरात यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. थोरातांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान  सागर भोईर हा अट्टल गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.   कालच भिवंडीत एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाली होती. दोन दिवसात पोलिसांना दोनवेळा मारहाण झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.