मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनाही स्थान द्या, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकार आणि विरोधी पक्ष नेत्यांना स्थान दिलं जातं, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीतही स्थान दिलं जावं, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे.
भाजपने ज्या पारदर्शकतेची मागणी मुंबई महापालिकेत केली आहे, तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारात देखील असावी. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार, लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेते उपस्थित असावेत, असा शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे.
दरम्यान, आमचे राजीनामे आजही तयार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पहात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशासमोर मंत्रिपद महत्त्वाचं नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.