शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी गेली दहा वर्ष गीता गवळी यांनी सेनेला पाठींबा दिला होता. गीता गवळी यांच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी गेली बारा वर्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती. गेली दोन टर्म महापालिका निवडणुकीत आणि एकदा विधानसभा निवडणुकीत नार्वेकर यांच्या मध्यस्थीने गीता गवळी यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता.
मात्र यंदा महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असल्याने पहिल्यांदा गवळींविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला होता.
तरीही गीता गवळी शिवसेनेशी वाटाघाटी करण्यास तयार होत्या. उद्धव ठाकरे यांची गीता गवळी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची सेनाभवन येथे भेट करून देतो असं आश्वासन देऊन एकनाथ शिंदे यांनी गवळी यांना शिवसेनाभवनात बोलवून घेतले.
मात्र उद्धव ठाकरे सेनाभवनात नव्हते हे कळल्यावर गीता गवळी संतापल्या. त्याचबरोबर मीडियाची उपस्थिती ही त्यांना फारशी रुचली नाही. त्यामुळे गवळी यांची एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यासोबतची बोलणी फिस्कटली आणि त्या सेनाभवनातून परतल्या.
ठाण्यात एकहाती सत्ता आणल्यानंतर मुंबईचा महापौर बसवण्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव करण्यास एकनाथ शिंदे यांनी कमालीचा सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील इतर नेते आणि मंत्री अस्वस्थ झालेत.
महापौर बसल्यावर राज्य सरकारचं भवितव्य ठरणार असं शिवसेनेतील नेत्यांकडून सांगितलं जातंय आणि म्हणूनच अपक्ष फोडून आपली कामगिरी दाखवण्याचा सेनेतील नेत्यांचा प्रयत्न सुरु आहेत.
मात्र अपक्षांना फोडण्यासाठी सुरु झालेली सेनेतली चुरस यावेळी मात्र भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अखेर गीता गवळी यांनी गेली दहा वर्षांची शिवसेनेची साथ सोडली आणि भाजपच्या गोटत सामिल झाल्या.
शिवसेनेत कोणी कोणता अपक्ष फोडला?
1) वॉर्ड क्र 41 - तुळशीराम शिंदे - मालाड (प) : एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री
2) वॉर्ड क्र 62 - चंगेज मुलतानी - अंधेरी (प) : विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री
3) वॉर्ड क्र 123 - स्नेहल मोरे - घाटकोपर (पू) : विनायक राऊत, खासदार
4) वॉर्ड क्र 160 - किरण लांडगे - कुर्ला (प) : हाजी अरफात शेख, मिलिंद नार्वेकर
संबंधित बातम्या