उल्हासनगर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या रात्री दादागिरी केल्याचं समोर आलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणांच्या अंगावर बुलेट घालत, जो दिसेल त्याला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची गस्त सुरू होती. कौशल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर जमले होते. याचवेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे हे तिथून त्यांच्या बुलेटवर चालले होते. मात्र घराबाहेर उभ्या असलेल्या मुलांना पाहून त्यांनी थेट मुलांच्या अंगावर बुलेट घातली. इतकंच नव्हे, तर जो सापडेल त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सुटले. तर एकाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा केली.


एपीआय पानसरे यांनी केलेल्या या मारहाणीत काही तरुणांना मुका मार लागला आहे. तर एका तरुणाचा मोबाईल सुद्धा फुटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली, त्यावेळी पानसरे हे दारूच्या नशेत असल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. या सगळ्यावर पोलिसांची प्रतिक्रिया विचारली असता, पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र ज्यांच्या हाती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असते, त्यांनी असा उन्माद करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न यानंतर उपस्थित केला जातोय. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैदही झाली आहे.



महत्त्वाच्या बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha