Child Vaccination In Mumbai : येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपासून कोविन (CoWIN) अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतही लहान मुलाच्या लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाकडून पालिकेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचा लसीकरणाला सुरवात होत आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पूर्णपणे तयारी झाली आहे. 


सोमवारपासून मुंबईमध्ये 9 लसीकरण केंद्रावर लहान मुलांचं लसीकरण केले जाणार आहे. सुरवातीला मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. तशाप्रकारची सोय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणले जाणार आहे. तसेच लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडले जाणार आहे. 


शिवाय इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थीही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून किंवा वॉक इन लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दोन दिवसांपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु झाली आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी विद्यार्थी, पालकांनी घ्यायची आहे. लसीकरण केंद्रावर एखाद्या मुलाला त्रास होत असेल, त्याच्या उपचारासाठी लसीकरण केंद्रावर पीडियाट्रिक वॉर्ड सुद्धा तयार करण्यात आला आहे. 


लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल?



  • कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.

  • नोंदणीसाठी  https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.

  • वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself  या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.

  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.

  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.

  • तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

  • लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.

  • पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.

  • तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.

  • तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
    तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.