मुंबई : ऑनलाईन पोर्टलवर महिलांची बदनामी करण्यात येत असून, हा मोठा गुन्हा आहे. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. याआधीही असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक म्हणाले.


या प्रकरणामध्ये मुंबईतील काही मुली देखील असल्याचे मलिक यांनी सांगितले. मुलींबद्दल वादग्रस्त मजकूर लिहून त्यांचे फोटो शेअर करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा करुन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक म्हणाले. काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे मुलींचे फोटे चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आले होते. केंद्र सरकारचे समर्थक अशी काही पोर्टल चालवत असून, त्यांच्याकडून पाठराखण होत असल्याचा आरोपही यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून जर दोषींवर कारवाई होत नसेल तर, महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील, असे मलिक यावेळी म्हणाले.


मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.  या प्रकरणी  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.


दिल्लीत एका महिलेने असे प्रसिद्ध केलेले फोटो ट्वीटरवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. हाच मुद्दा प्रियंक चतुर्वेदी यांनी उचलून धरला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: