COVID19: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मुंबईत आज 8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाही मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 376 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 183 दिवसांवर पोहचलाय. 


सोमवारपासून मुंबईमध्ये 9 लसीकरण केंद्रावर लहान मुलांचं लसीकरण केले जाणार आहे. सुरवातीला मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. तशाप्रकारची सोय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणले जाणार आहे. तसेच लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडले जाणार आहे. 


शिवाय इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थीही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून किंवा वॉक इन लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दोन दिवसांपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु झाली आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी विद्यार्थी, पालकांनी घ्यायची आहे. लसीकरण केंद्रावर एखाद्या मुलाला त्रास होत असेल, त्याच्या उपचारासाठी लसीकरण केंद्रावर पीडियाट्रिक वॉर्ड सुद्धा तयार करण्यात आला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha