कल्याण : टीसींच्या सतर्कतेमुळे पळून जाणारं अल्पवयीन जोडपं सापडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. आज सकाळी मुंबईहून लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार समोर आला.
पुष्पक एक्सप्रेस सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सीएसएमटीहून रवाना झाल्यावर काही वेळातच तिकीट तपासत असलेले टीसी एस. के. सांबरे आणि लक्ष्मण सावंत यांच्याकडे एक अल्पवयीन जोडपं आलं. त्यांच्याकडे असलेल्या जनरलच्या तिकीटावर दंड भरण्याची तयारी दर्शवत त्यांनी लखनौपर्यंत बर्थ देण्याची मागणी टीसींकडे केली.
या जोडप्याची एकंदरित वागणूक संशयास्पद वाटत असतानाच सीएसएमटी स्थानकात एका मुलीचे पालक मुलीला शोधत असल्याची माहिती गाडीतील स्टाफकडून त्यांना मिळाली. त्यामुळे 9 वाजून 10 मिनिटांनी कल्याण स्थानक येताच टीसींनी या दोघांनाही आरपीएफच्या ताब्यात दिलं.
आरपीएफने चौकशी केल्यावर हे दोघे बांद्रा इथे राहणारे असून काल सायंकाळी घरातून पळून आल्याची कबुली त्यांनी दिली. शिवाय मुलीच्या वडिलांनी बांद्रा पोलीस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे या दोघांच्या पालकांना आणि बांद्रा पोलिसांना बोलावून अल्पवयीन जोडप्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून बांद्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.