कल्याण : मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर पडलेल्या एका 6 वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी देवदूतासारखा धावून आलेला रेल्वेच्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी आपल्या शौर्याचं दर्शन घडवले होते. आता याच मयुर शेळके यांनी त्यांना मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम त्या अंध मातेला देणार असल्याचं जाहीर केलं आहे.


रेल्वे मंत्रालयाचा जिगरबाज Mayur Shelke यांना सलाम, 50 हजारांचं बक्षीस जाहीर! 


वांगणी स्टेशनवर काय घडलं होतं?
मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षांचा एक मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालता चालता तोल जाऊन तो मुलगा ट्रॅकवर पडला. मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवर पडला नेमक्या त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. त्या मुलाची अंध आई आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बावरलेल्या आईला मुलगा नेमका कुठे पडला हेच कळत नव्हतं. ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून मुलगा कसाबसा उठून प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता. परंतु प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने त्याला काही चढता येत नव्हतं. ही बाब तिथे असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी पाहिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. एक्स्प्रेस काही सेकंदाच्या अंतरावर असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते मुलापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःही वायुवेगाने  प्लॅटफॉर्मवर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार तिथल्या प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयुर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर कदाचित त्या अंध आईने आपल्या मुलाला गमावलं असतं. परंतु मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयुर शेळकेने वाचवलं. 


ते थरारक सात सेंकद! जिगरबाज पॉईंटमन मयुर शेळके म्हणाला, काही क्षण भीती वाटली, मात्र...


रेल्वेकडून 50 हजार रुपयांचं बक्षिस
एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगाने येत असतानाही, मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता रेल्वे मंत्रालयाने देखील त्यांच्या या धाडसाची दखल घेत, त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयुर शेळके यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांची पाठ थोपाटली. 


एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला....


बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला
परंतु मयुर यांची परोपकारी वृत्ती इथेच संपली नाही. बक्षिस स्वरुपात मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम म्हणजेच 25 हजार रुपये त्या अंध मातेला देण्याचं जाहीर करुन आपल्यातील माणुसकीचं दर्शन घडवले. ही महिला अंध असून गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे मुलाच्या शिक्षणात हातभार लागावा या हेतूने ही रक्कम देणार असल्याचं मयुर शेळके यांनी सांगितलं. मयुर शेळके यांच्या या निर्णयाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.