मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहेत. कोरोनावर अद्याप ठोस उपाय आला नसला तरी बाधितांवरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर सध्या केला जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालं नाही तर रुग्ण बरा होईल की नाही अशी धाकूधक नातेवाईकांच्या मनात असते. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनशिवाय 800 हून अधिक रुग्णांना बरं करण्याची किमया महाडमधील डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी करुन दाखवली आहे. रेमडेसिवीर ही संजिवनी नाही, माझे मित्र डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी रेमडेसिवीरविना 800 पेक्षा जास्त रुग्ण बरे केले, असं महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही नमूद केलं होतं. रेमडेसिवीरशिवाय रुग्णांना बरं कसं केलं याविषयी एबीपी माझाने डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याशी संवाद साधला.


रेमडेसिवीरशिवाय रुग्ण बरा होत नाही, या मानसिकतेसंदर्भात डॉ. बावस्कर म्हणाले की, "कोविडवर सुरुवातीला कोणताही उपाय नसल्याने काही जरी वापरलं तर ते महत्त्वाचं आहे अशी भावना निर्माण झाली. रेमडेसिवीरचा भारतीय वैज्ञानिकांनीच शोध लावलं. मीडियाने रेमडेसिवीरला उचलून धरलं, मग डॉक्टरांनीही तेच केलं. ग्रामीण भागात रेमडेसिवीर उपलब्ध नव्हतं. पण त्यामुळे रुग्णांना मरु द्यायचं का तर नाही. त्यासाठी पर्याय शोधला. त्यानंतर समजलं की रेमडेसिवीरची गरजच लागत नाही. रेमडेसिवीर देण्यासाठी क्रायटेरिया असतो. ज्याप्रमाणे मीडियात सांगितलं जातं तेवढी त्याची गरज नाही." 


रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिवीरचा अट्टाहास केला जातो. हा माझा स्वत:चा अनुभव आहे, असं डॉ. बावस्कर म्हणाले. "लोकांच्या मनात रेमडेसिवीरविषयी एक ग्रह तयार झाला आहे. मृत्यूदरामुळे कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काही होणार नाही, असा विश्वास डॉक्टरांनी रुग्णांना द्यायला हवा, असं ते म्हणाले. "रुग्णांना रेमडेसिवीर प्रीस्क्राईब करु नये हे सरकारने उशिरा सांगितलं. कोणाला रेमडेसिवीर द्यावं याबाबत सरकारने ऑडिट केलं पाहिजे," अशी सूचनाही त्यांनी केली. 


ना कोणत्या रुग्णासाठी रेमडेसिवीर वापरलं, ना कोणाला सल्ला दिला
"मी आतापर्यंत एकाही रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरलं नाही आणि कोणालाही ते घेण्याचा सल्ला दिला नाही. शिवाय कोणीही माझ्याकडे याबाबत विचारणा केली नाही. उच्च आणि मध्यमवर्गीयांमध्ये रेमडेसिवीर प्रचलित आहे. खेड्यांमध्ये रेमडेसिवीर आलं नाही. माझ्याकडे कोणी रेमडेसिवीर मागत नाही आणि वापरलं जात नाही," असंही डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी नमूद केलं


ग्रामीण भागातील रुग्ण बाधा झाल्यानंतर आठव्या किंवा नवव्या दिवशी येतात. पण हे त्यांच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. अशावेळी जनजागृती कशी करता? असं विचारलं असता डॉ. बावस्कर म्हणाले की, "मी केलेला मेसेज सध्या व्हायरल होता. जनरल प्रॅक्टिशनर्सनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, कणकण असलेला कोणताही रुग्ण आला तर त्याला सरकारी रुग्णालयात स्वॅब टेस्ट करण्यास सांगावं."


ग्रामीण भागात शहरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता रुग्णसंख्या वाढली आहे. वयस्कर रुग्ण आहेतच पण 20-40 वर्षे वयोगटातील रुग्ण वाढत आहेत, ही गंभीर बाब असल्याचं डॉ. बावस्कर यांनी म्हटलं.


भारताचं कुठे चुकलं?
कोविड-19 मुक्त होणारा इस्रायल हा पहिला देश ठरला आहे. मग कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताचं कुठे चुकलं. यावर बावस्करांनी उत्तर दिलं की, "इस्रायलमध्ये सगळ्यांचं लसीकरण झालं. तो देश लहान आहे. आपला देश मोठा आहे. त्यानुसार आपले आरोग्य कर्मचारी जास्त आहेत. सरकारने वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाची दुसरी लाट आली नसती."
 
हे सोपे उपाय कराच!


1. कणकण आणि ताप अंगावर काढायचा नाही


2. स्बॅव टेस्ट करायला घाबरायचं नाही


3. दररोज व्यायाम करा, मधुमेह नियत्रंणात पाहिजे


4. लसीचे दोन्ही डोस घेतलेच पाहिजे


5. मास्क व्यवस्थित वापरावा, माझ्यापासून दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घ्यावी


कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा थकली आहे. सरकार थकून जाईल तेव्हा आपण सगळेच थकून जाऊ. त्यामुळे सरकारला आणि देशाला उभं करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असं डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी सांगितलं.