रायगड : पॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले. रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) ही थरारक घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.




वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिलं. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतलं. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले. 


 




पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.