मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह 35 जणांना पीएमएलए कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळांसह इतरांना वैयक्तिक हमीवर तात्पुरता जामीन मंजूर केला.
नाशिक येथील छगन भुजबळ यांची 25 कोटींची संपत्ती नव्याने जप्त केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही याविषयी मुंबईतील पीएमएलए कोर्ट 6 सप्टेंबरला आपला निर्णय देणार आहे. दरम्यान सोमवारच्या सुनावणीस छगन भुजबळ कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत. कोर्टाकडे येत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
भुजबळ यांची नाशिक येथील 25 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून त्याचा विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला.
या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामीनाकरता बाँड देणं कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही, असाही भुजबळांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. तसेच एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही, कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाला करुन दिली.
ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचं मान्य केलं. पण त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने कोर्टाला केली. यावर कोर्टाने 6 सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचं स्पष्ट करत तूर्तास भुजबळ कुटुंबीयांसहित इतर आरोपींनाही तात्पुरता दिलासा दिला आहे.
भुजबळांसह 35 जणांना तूर्तास दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत जामीन मंजूर
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
06 Aug 2018 01:10 PM (IST)
ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळांसह इतरांना वैयक्तिक हमीवर तात्पुरता जामीन मंजूर केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -