कोकणच्या चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2018 08:46 AM (IST)
कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : शिवसेनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी बदल सुरुच आहेत. विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलण्याची शक्यता आहे. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. कोकणच्या संपर्क नेते पदावरून मंत्री उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांचे पंख छाटण्यात आले आहेत. त्यांच्याकडे कोकणातील सर्व मतदारसंघांची जबाबदारी आतापर्यंत होती, मात्र आता केवळ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारीच देसाईंकडे असेल. एकनाथ शिंदेकडे ठाणे, कल्याण,भिवंडी आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणुकांआधी आणखी महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं 2019 साठी ‘मिशन मुंबई’ शिवसेनेने मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. सुभाष देसाई, रामदास कदम आणि सुनिल प्रभूंच्या तक्रारीनंतर कॅप्टन अभिजित अडसूळ यांची विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ हे विभाग 2 (कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिमचे) विभागप्रमुख होते. कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या ऐवजी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे. तर महिला विभाग संघटकपदी विशाखा मोरयेंना संधी मिळाली आहे.