मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याचे त्याची कथित प्रेयसी कौसारसोबतचे नवे फोटो प्रसिद्ध् झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात असतानाही काढण्यात आलेल्या या फोटोंनी तळोजा जेल प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याची ही शिक्षा आहे की ऐश असा सवाल आता विचारला जातोय.

 
1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेला अबू सालेम आपल्या जन्मठेपेच्या शिक्षेतही अशी मजा करताना दिसतोय. साधारण दोन वर्षांपूर्वी 2014 मध्ये अबू सालेमचं धावत्या ट्रेनमधील लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं. त्या लग्नाचे पुरावे देणारे फोटो 'मिड डे' या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेत.

 
2012 ते 2015 या काळात ट्रेनमधल्या प्रवासाचे हे फोटो मुंबई पोलीस आणि जेल प्रशासनाचे वाभाडे काढणारे ठरलेत. अबू सालेम हा मुंबईतल्या 1993 च्या बॉम्ब ब्लास्टमधील एक मुख्य आरोपी आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्याविरोधात लखनऊ कोर्टात खटला सुरु आहे. दिल्लीत एका व्यावसायिकाकडून 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसंच दिल्लीच्या पटियाला कोर्टातही बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्याविरोधात खटला दाखल करण्यात आलाय.

 
राज्यासह देशभरात ज्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा या अंडरवर्ल्ड डॉनला सुनावणीसाठी मुंबई पोलिसांचं एस्कॉर्ट पथक दिल्ली, लखनऊला रेल्वेनं घेऊन जात असतात आणि याच प्रवासात हे फोटो काढण्यात आलेत.

 
या फोटोंमध्ये अबू सालेमसोबत असलेली तरुणी सय्यद बहार कौसर ही मुंब्र्याची रहिवाशी असून तिने याआधीही अबूसोबत निकाह करण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती... मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर सारखी सारखी तिची बदनामी का केली जाते असा सवाल तिच्या वकिलांनी विचारलाय.

 

 
केवळ नातेवाईकांना भेटण्याचीच नव्हे तर त्यांच्याशी फोनवर बोलण्याचीही मुभा या डॉनला देण्यात आलीय. लखनऊ रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रुममधल्या एका फोटोमध्ये पोलिस बंदोबस्तात असतानाही अबू सालेम बिनधास्त मोबाईलवर बोलतोय.

 

 



 
बिल्डर प्रदीप जैनची हत्या केल्याप्रकरणी अबू सालेम सध्या तळोजा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असून याआधीही त्याला जेलमध्ये सर्व सुखसोयी मिळत असल्याची तक्रार करण्यात आलीय. आता तर त्याला एस्कॉर्ट करतानाचे हे फोटो समोर आलेत. त्यामुळे पोलीस त्यावर काय कारवाई करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.