मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ हा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गंगूबाईंच्या कुटुंबियांनी या चित्रपटावर आक्षेप घेत मुंबईतील सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत भन्साळी यांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.


हुसैन झैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित भन्साळी यांच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट असून पुस्तकासाठी जेन बोर्गिस यांनी संशोधन केलं आहे. या पुस्तकातील नमूद गोष्टी मानहानी करणाऱ्या असल्याचे असून पुस्तकाच्या पान क्र. 50 ते 69 पर्यंतचा मजकूर चुकीचा असल्याची दावा करत गंगुबाई यांचा मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी ही याचिका दाखल केली आहे. हे पुस्तक त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे पुस्तकातील काही भाग हटविण्यात यावा आणि भन्साळी यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. आहे.


याबरोबरच पुस्तकाची छपाई आणि विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी बाबूजी यांनी याचिकेतून केली आहे. या चित्रपटाचा प्रोमो जाहीर झाल्यानंतर गंगुबाईंच्या कुटुंबासंबंधी अफवांचं पीक आलं आहे. त्यांना नको नको ते आरोप सहन करावे लागत असून मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्याचं या याचिकेतून नमूद करण्यात आलं आहे. तसे पाहिल्यास संजय लीला भन्साळी आणि वाद यांचे फार जुने नाते आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत हे चित्रपट चित्रीकरणापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यात आता त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाची भर पडली आहे.