मुंबई : प्रजा फाऊंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचं चालू कार्यकाळातील तिसरं प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे तपशील आणि आवश्यक सुधारणा यांची मांडणी केलेली आहे.


2019 हे निवडणुकांचे (केंद्र आणि राज्यातील) वर्ष असल्याने नगरसेवकांच्या कामगिरीचा आलेख उतरता राहिलेला असून 2018-19 मध्ये 60.2 टक्क्यांवरुन 2019-20 मध्ये 55.7 टक्क्यांवर आला आहे. नगरसेवकांना त्यांची नियमित कामं, सभागृहातील जबाबदाऱ्यांपेक्षा निवडणूक प्रचाराला प्राधान्य द्यावं लागलं हे या अहवालातून स्पष्ट झालं आहे.


प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, भाजपचे नगरसेवक हरिश छेडा यांनी या वर्षीच्या प्रगती पुस्तकात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना गुण 82.7 टक्के गुण मिळाले आहेत. तर भाजपच्याच नेहल शाह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे गुण 80 टक्के आहे. 79.9 टक्के गुणांसह शिवसेनेचे नगरसेवक अनंत नर तिसऱ्या क्रमांकावर आहेत


नागरिकांच्या तक्रारींना धरुन किती नगरसेवकांनी प्रश्न विचारले हे पाहिले असता, 90 टक्के म्हणजेच 199 नगरसेवकांना 2019-20मध्ये 50 टक्क्यांहून कमी गुण मिळाल्याचं दिसतं.


पक्षनिहाय कामगिरीमध्ये असं दिसून येतं की 2019-20 या वर्षात 57.9 टक्क्यांसह कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची कामगिरी सर्वाधिक चांगली राहिली. त्यानंतर भाजप (56.7 टक्के) आणि शिवसेना (55.3 टक्के) यांचा क्रमांक लागतो.


दरम्यान, कोविड काळात मदतकार्य आणि लागेल ती मदत करण्याच्या कामांमध्ये नगरसेवक आघाडीवर राहिलेले आहेत. शहरी क्षेत्राच्या स्वशासनामध्ये नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं यावेळी पुन्हा दिसून आल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालात मांडण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या


महापालिका शाळेतल्या विद्यार्थी संख्येत गेल्या पाच वर्षात 24 टक्क्यांनी घट


मुंबईत महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये 51 टक्क्यांनी वाढ


मुंबईमधील नगरसेवकांच्या कामगिरीत घसरण, नागरिकांच्या समस्यांबाबत अनास्था, अहवालातून माहिती उघड