मुंबईमधील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या 10 नगरसेवकांमध्ये 7 महिला नगरसेविका असून पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील नगरसेवकांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे. प्रजा फाऊंडेशन या एनजीओकडून महापालिकेतील नगरसेवकांचे सभागृहातील विचारविनिमय, त्यांचे कामकाज आणि त्यांच्या मतदार संघातील कामांबद्दलचे विश्लेषण यावर मुंबई प्रेस क्लब येथे नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक प्रसिद्ध करण्यात आले.
या अहवालानुसार गेल्या वर्षी (2018) नगरसेवकांनी 2609 प्रश्न उपस्थित केले होते. यावर्षी त्यात घट होऊन 2571 इतकेच प्रश्न नगरसेवकांनी विचारले आहेत. मुंबई महानगरपालिकेत 227 नगरसेवक असून त्यापैकी 93 टक्के म्हणजेच 206 नगरसेवकांनी सभागृहात नागरिकांच्या तक्रारींबाबत विचारविनिमय न केल्याने 50 टक्के पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
सभागृह, विविध समित्या तसेच प्रभाग समित्यांना नगरसेवकांना उपस्थित राहावे लागते. 2018 मध्ये नगरसेवकांची उपस्थिती 80.74 टक्के होती त्यात घसरण होऊन यावर्षी 77.56 टक्के इतकी उपस्थिती नोंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये 7 महिला नगरसेविकांचा समावेश आहे. त्यात शिवसेनेच्या सुजाता पटेकर या 82.30 टक्के गुण मिळवून अव्वल स्थानी आहे. किशोरी पेडणेकर या 81.25 टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भाजपच्या सेजल देसाई या 77.33 टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे 5, भाजपाचे 3 तर काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये 2014 साली 5 महिला नगरसेविका होत्या, 2018 साली 4 नगरसेविका तर यावर्षी 7 नगरसेविकांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
यांनी विचारला नाही एकही प्रश्न
दिनेश कुबल, गुलनाज कुरेशी, उपेंद्र सावंत, मनीषा रहाटे, आयेशा बानो खान, सुप्रिया मोरे या सहा नगरसेवकांनी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित नाही. तर गुलनाज कुरेशी, मनीषा रहाटे आणि सुप्रिया मोरे या तीन नगरसेवकांनी निवडून आल्यापासून म्हणजेच मार्च 2017 ते मार्च 2019 या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही असे अहवालात म्हटले आहे.