मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतची नाराजी जनतेने मतातून व्यक्त केली. भाजपवर जनता नाराज आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू म्हणून टिंगल टवाळी करणं भाजपला महागात पडलं," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

"भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय अन्य पक्षाची भूमिकाही महत्त्वाची आहे. समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बसपा यांनी यूपीएसोबत यावं अशी आमची इच्छा आहे. इतर पक्षांना मर्यादा आहेत," असंही पवारांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले की, "या निवडणुकीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. साडेचार वर्षात केंद्र सरकारचा कारभार, निर्णय आणि आक्रमक प्रचार यावर लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीबाबत धोरणात्मक कार्यक्रम, जाणकारांचा सल्ला न घेतला निर्णय घेण्याची पद्धत, आर्थिक संस्था आणि स्वायत्त संस्थांवर हल्ला करण्याच्या भूमिकेवर लोकांची नाराजी आहे. सुप्रीम कोर्टाचे चार न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट मत मांडतात, याचा परिणाम सरकारविरोधी झाला आहे. रिझर्व्ह बँकेवरही हल्ला करण्याची भूमिका, ज्या गव्हर्नरचा कालावधी तीन वर्षांचा होता आणि सत्ताधाऱ्यांनीच त्यांची नियुक्ती केली, त्यांनी राजीनामा देऊन जाणं पसंत केलं. सीबीआयच्या प्रमुखांमधील संघर्ष, लोकांना सक्तीच्या रजेवर जाण्यासंदर्भात घेतलेला निर्णय, या स्वायत्त संस्थांचं भवितव्य भाजप सरकारच्या राजवटीत काळजी करण्यासारखं झालं आहे, या निष्कर्षापर्यंत लोक पोहोचले आहेत."

निवडणुकीत प्रचारात विरोधकांच्या धोरणावर टीका-टिप्पणीही करायची असते. पण काही मर्यादा पाळायच्या असतात. या निवडणुकीत एक गोष्ट लोकांनी पाहिली की, या निवडणुकीत पंतप्रधानांनी वैयक्तिक टीका केली. प्रचारात कायमच नेहरु-गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघे एका पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा सदस्य आहेत. परंतु दोघे सत्तेत कुठेही नव्हते. त्यांच्यावरील हल्ल्याचा अनुकूल परिणाम भाजपसाठी झाला नाही. त्यांच्यावरील हल्ल्याचं मला आश्चर्य वाटतं. पंतप्रधान ही स्वत एक संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्यामुळे समाजाच्या सगळ्या वर्गात मोदींविरोधात नाराजी दिसते, असंही मोदी म्हणाले.

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद