Payal Tadvi Suicide Case: मुंबई : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याशी संबंधित खटल्यांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग (Video Recording) करणं बंधनकारक करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं हा निकाल बुधवारी जाहीर केला.


राज्याचे महाधिवक्ता, केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल आणि अमायकस क्युरी यांची बाजू ऐकून घेत या प्रकरणावरील आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. तेव्हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याशी संबंधित पीडितांना व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार असून त्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, असं या आदेशात नमूद करत ही याचिका निकाली काढली.


याचिका काय होती?


डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी या खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली होती. तत्कालीन न्यायमूर्ती दामा नायडू यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या पुढे सुनावणीसाठी आलं असता त्यांनी मात्र न्यायालयीन प्रोसिडिंग ही सर्वसामान्य प्रोसिडिंग मध्ये मोडत नसल्याचं स्पष्ट करत एससी, एसटी कायद्याअंतर्गत खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार नाही असा निर्णय दिला होता. तक्रारदारांनी याविरोधात दाद मागितल्यानं हे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आलं होतं.


प्रकरण काय? 


डॉ. पायल तडवीने 22 मे 2019 रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली होती. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास पुढे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला.