मुंबई: भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील लोकसभेच्या २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या दोन जागांचा समावेश आहे. भाजपकडून मुंबईतील उमेदवारीबाबत धक्कातंत्र वापरले जाणार, असा अंदाज सुरुवातीपासूनच होता. आज उमेदवारी यादी समोर आल्यानंतर हा अंदाज खरा ठरला. कारण भाजप (BJP) नेतृत्त्वाने उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन लोकसभा (Loksabha) मतदारसंघातील विद्यमान खासदारांचे तिकीट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) आणि उत्तर मुंबईतून भाजपचे हेविवेट खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्याऐवजी पियुष गोयल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. यापैकी पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. परंतु, भाजपश्रेष्ठींनी ईशान्य मुंबईतून मनोज कोटक (Manoj kotak) यांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


गेल्या पाच वर्षांमधील मनोज कोटक यांची कामगिरी आणि त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क समाधानकारक होता. त्यामुळे मनोज कोटक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असा अनेकांना विश्वास होता. परंतु, ऐनवेळी ईशान्य मुंबईसाठी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर मनोज कोटक यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याकडे धाव घेतली. काहीवेळापूर्वीच मनोज कोटक सागर बंगल्यावर दाखल झाले असून आता ते फडणवीसांशी काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


शेवटच्या क्षणी फडणवीसांचा फोन आला, मिहिर कोटेचा यांची माहिती


भाजपकडून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिहिर कोटेचा यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज कोटक यांच्याशी तीनवेळा फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगितले. या चर्चेचा तपशील त्यांनी सांगितलेला नाही. परंतु, आपण लवकरच मनोज कोटक यांना भेटू, असे मिहिर कोटेचा यांनी सांगितले. किरीट सोमय्या आणि मनोज कोटकर यांनी आजपर्यंत ईशान्य मुंबई मतदारसंघात चांगले काम केले आहे. आम्ही पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहोत. मला जी जबाबदारी दिली आहे, ती मी ताकदीने पार पाडेन. मनोज कोटक माझे चांगले मित्र आहेत, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रच काम करत आहोत. हा व्यवस्थेचा भाग आहे. मी नरेंद्र मोदी यांचा सैनिक आहे. आमच्यासाठी पक्ष सर्वोपरी आहे. लोकसभा उमेदवारीबाबत मला शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, असे मिहिर कोटेचा यांनी सांगितले.


गेल्या लोकसभा निवडणुकीत काय घडले? 


2019 पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या ईशान्य मुंबईचे खासदार होते. त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. परंतु, मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरुन सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाले होते. 2019 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेची मनधरणी करावी लागली होती. त्यावेळी शिवसेनेच्या सांगण्यावरुन ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आणि मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी मनोज कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता.


आणखी वाचा


भाजपचे हे 20 उमेदवार मैदानात, कोणाला कोणता मतदारसंघ?