Sanjay Raut Bail: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे पीएमएलए विशेष कोर्टाने (PMLA Special Court) ईडीवर (ED) ओढले आहेत. ईडीने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक नसून ईडीने स्वत: च आरोपी निवडले असल्याचे विशेष कोर्टाने म्हटले  आहे. 


पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष कोर्टाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामिनासाठी 122 पानी  आदेश काढले. या आदेशात कोर्टाने आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन देताना ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, दोन्ही आरोपींना बेकायदेशीरपणे अटक केली आहे असे कोर्टाला वाटत आहे. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला.  


पीएमएलए कोर्टाने आपल्या 122 पानी आदेशात ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने अतिशय महत्त्वाची निरीक्षण नोंदवले आहे. कोर्टाने म्हटले की, दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणी विशेष कोर्टाने केली. 


या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्याऐवजी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीने आरोपी स्वत: च निवडले असल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने म्हणत ईडीच्या तपासावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.  


कोर्टाने इ़डी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. त्याच्या परिणामी सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल असेही कोर्टाने म्हटले. 


पीएमएलए विशेष कोर्टाने ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने पत्राचाळ घोटाळ्यातील तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. 


राऊत यांच्या अटकेसाठी कारणीभूत असलेले पत्रचाळ प्रकरण काय?


मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा ईडीचा आरोप आहे. 


गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे 'फ्रंटमॅन' म्हणून वावरत होते. प्रवीण राऊत यांच्या मार्फत संजय राऊत व्यवहार करत होते. घोटाळ्यातील पैशांचा वापर संजय राऊत यांनी विविध मालमत्ता खरेदी केला असल्याचा आरोप  ईडीने केला आहे.