मुंबई : कधीही न थांबणाऱ्या, गर्दीने तुडुंब भरलेल्या मुंबई शहरात एखादी वस्तू हरवली तर ती सापडण्याची शाश्वती फारच कमी असतले. जर वस्तू मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये हरवली तर ती सापडण्याची शक्यताही धूसर होऊन जाते. परंतु एक दोन नव्हे तर तब्बल 14 वर्षांनी एका लोकल प्रवाशाचं हरवलेलं पाकीट रेल्वे पोलिसांना सापडलं आहे. हेमंत पडळकर असं या लोकल प्रवाशाचं नाव असून 2006 साली लोकल ट्रेनमध्ये त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं, ज्यात 900 रुपये होते.
सीएसएमटीहून पनवेल या लोकलमधून प्रवास करताना हेमंत पडळकर यांचं पाकीट हरवलं होतं. यंदा एप्रिल महिन्यात वाशी रेल्वे पोलिसांनी हेमंत पडळकर यांना फोन करुन त्यांचं 2006 मध्ये चोरीला गेलेलं पाकिट सापडल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता. 14 वर्षांपूर्वी हरवलेलं पाकीट सापडेल, अशी अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. पण रेल्वे पोलिसांच्या अनपेक्षित फोनमुळे त्यांना सुखद धक्का बसला. मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पाकीट आणता आलं नव्हतं. मात्र नियमांमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर पडळकर वाशीच्या जीआरपी कार्यालयात गेले. परंतु त्यांना पाकिटातील रकमेपैकी अर्धीच रक्कम परत मिळाली.
हेमंत पडळकर म्हणाले की, "माझं पाकीट हरवलं त्यावेळी त्यात 900 रुपये होते. यामध्ये नोटाबंदीनंतर चलनातून हद्दपार झालेली 500 रुपयांची नोटही होती. वाशीच्या रेल्वे पोलिसांनी मला 900 रुपयांपैकी 300 रुपये परत केले आणि 100 रुपये स्टॅम्प पेपरसाठी कापले. तर उरलेले 500 रुपये नवीन नोट मिळाल्यानंतर परत करणार आहेत."
ते पुढे म्हणाले की, "जीआरपी कार्यालयात गेलो असता तिथे अनेक जण चोरी गेलेलं पाकिटं परत घेण्यासाठी आले होते. या पाकिटांमध्ये चलनातून हद्दपार झालेल्या हजारो रुपयेच्या किंमतीच्या नोटा होत्या. आता त्यांना हे पैसे कसे मिळणार असा प्रश्न मला पडला होता. मात्र मला पैसे परत मिळाल्याचा आनंद आहे."
हेमंत पडळकर यांचं पाकीट चोरणाऱ्याला काही महिन्यांपूर्वीच अटक केल्याचं जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितलं. "पडळकरांच्या पाकिटातून 900 रुपये मिळाले. त्यापैकी 300 रुपये पडळकरांना परत केले आहेत तर उर्वरित 500 रुपये नवीन नोट मिळाल्यावर परत केले जातील," असंही अधिकाऱ्याने सांगितलं.