मुंबई : सोशल मीडियावर लोक आपले मित्र मैत्रिणी, कुटुंब किंवा सोशल नेटवर्किंगसाठी येतात. पण काहीजण निराश मनस्थितीत टोकाचं पाऊल उचलण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर करतात. शनिवारी आयर्लंड येथील फेसबुक कार्यालयातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिल्ली सायबर विभागात फोन गेला, डीसीपी अनयेश रॉय याना एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, त्याच्या फेसबुक अॅक्टीविटीवरून फेसबुकच्या अधिकृत कार्यालयातून सतर्क करण्यात आले.

संबंधित मोबाईल क्रमांक दिल्लीतील रहिवाश्याचा असून तो पूर्व दिल्लीत राहत असल्याचे कळलं. दिल्ली सायबर विभागाने पूर्व दिल्लीतील पोलिसांना डीसीपी जसमित सिंग यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या घरी जाऊन चौकशी केली. हा नंबर सुरेश नामक व्यक्तीचा (नाव बदलले) असून तो मुंबईत आहे, पण हा नंबर त्याच्या बायकोच्या नावावर असल्याची माहिती त्याच्या बायकोने दिली. सुरेश मुंबईत शेफ म्हणून काम करतो, पण कुठे राहतो ह्याची माहिती तिला ही नव्हती.

सुरेशला नुकताच बाळ झालं होतं. पत्नीशी त्याचा वाद देखील झाला होता. म्हणून 15 दिवसांपूर्वी तो मुंबईत परत आला होता. सुरेशच्या बायकोने पोलिसांना माहिती दिली. दिल्लीच्या सायबर विभागाने मुंबईतील सायबर विभागाला याबाबत त्वरित कळवलं.

मुंबई सायबर विभागाच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर आणि त्यांच्या टीमने सुरेशला संपर्क करण्याचे प्रयत्न केले. त्याचा फोन बंद होता, त्याच्या आईच्या माध्यमातून वॉट्सअप वर संपर्क होतो का हा प्रयत्न केला. मध्येच सुरेशने फोन सुरू केला आणि तेव्हा पोलिसांनी त्याला सायबर पोलिसांनी बोलण्यात गुंगवून ठेवलं. त्याचे स्थान भाईंदर आलं. आणि लगेच भाईंदर पोलिसांना कळवण्यात आलं. सायबर पोलीस आणि भाईंदर पोलीस हे सुरेशपर्यंत पोहोचले. नोकरी गेली, त्यात बाळ झाले, आर्थिक जबाबदारी आणि पत्नीशी वाद त्यामुळे सुरेश निराश झाला होता. त्यामुळे तो टोकाचे पाऊल उचलणार होता. पण पोलिसांनी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहचून त्याला समजावले. त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवलं.

फेसबुकवर आत्महत्येबाबत सुरेशने केलेला सर्च. यामुळे अलर्ट झालेल्या फेसबुकने दिल्ली सायबर विभागाला कळवलं त्यांनी मुंबई आणि संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेला हे नाट्य पहाटे तीनच्या सुमारास थांबले.

पोलिसांवर नेहमीच टीका होते की गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला. यावरून ते वाद घालतात, काम टाळतात.. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणतीही सीमा नसते. ऑनलाइन जगात काहीही होऊ शकत. अशा वेळी दिल्ली आणि मुंबई सायबर विभागाने योग्य वेळी तत्परता दाखवली म्हणून एक व्यक्तीचा जीव वाचला. हे ही एक वेगळं उदाहरण.

जिनपिंग यांची हिटलरशी तुलना, स्ट्रॅट न्यूज ग्लोबलच्या नितीन गोखलेंना व्हिडीओ डिलीट करण्याची धमकी