पालघर : पालघर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सध्या अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. तर चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चोरी करण्यासाठी हे चोर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. एका चोराने चक्क पंजाबी ड्रेस परिधान करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न एका डॉक्टरच्या सतर्कतेमुळे हाणून पाडला.


बोईसर तारापूर परिसरात सध्या चोऱ्या आणि घरफोडीचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी (1 मार्च) दुपारच्या सुमारास खैरापाडा कृष्णानगर येथील महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये महिलेच्या वेशात हातोडी, मिरची पावडर आणि गुंगीचा स्प्रे घेऊन चोर शिरला. परंतु डॉक्टरच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देऊन बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले.


बोईसर जवळील खैरापाडा कृष्णानगर येथील डॉ. प्रियंका शास्त्री यांच्या होमिओपथी क्लिनिकमध्ये दुपारच्या सुमारास महिलेच्या वेशात एक व्यक्ती आली. परंतु तिच्याबाबत संशय आल्याने महिला डॉक्टरने सतर्कता दाखवत नागरिकांना बोलावून व्यक्तीची झडती घेतली असता महिलेचे कपडे परिधान केलेला पुरुष निघाला. त्याच्याकडे लोखंडी हातोडी, मिरची पावडर आणि गुंगीचा स्प्रे सापडल्याने हा इसम चोरी करण्याच्या उद्देशाने आला असावा, या शंकेने नागरिकांनी त्याचे हात बांधून बेदम चोप देत बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले.