Maharashtra Bhiwandi Crime News : भिवंडी (Maharashtra Bhiwandi News) शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. घरातील खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडून पोबारा केला आहे. खोणी गावातील अॅड अजय पाटील हे आपल्या पत्नी मुलासह एका खोलीत तर त्यांची आई नंदा व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते. ता रात्री अडीच वाजताच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी तोडून कार्यालयात प्रवेश केला. परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घरात वळवला.  


दरवाजाच्या आतील कडी उचकटून आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले. त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली तर गळ्यातील गंठन व हातातील बांगड्या हिसकावून घेतले. यावेळी त्यांनी मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी विनंतीही केली. 


त्याच वेळी अजय पाटील यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून जोरजोरात आरडाओरड केली. यानंतर दरोडेखोरांनी पलायन केले. काही युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगड ग्रामस्थांवर भिरकावले.


भयभीत पाटील कुटुंबीयांनी स्थानिक निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. रात्री गस्त करीत असलेले दोन पोलीस घटनास्थळी एका तासानंतर येऊन गेले. परंतु त्यांनी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला दिला आणि निघून गेले. 


दरम्यान कुटुंबीय भयभीत झाले आहे. दरोडेखोर नजीकच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha