मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेत नवीन पाहुण्यांचं आगमन होणार आहे. येत्या दोन महिन्यात बिबट्यांची जोडी प्राणिसंग्रहालयात दाखल होणार आहे.
मंगळुरुमधील पिलीकुला प्राणिसंग्रहालयातून दोन बिबट्यांना राणीच्या बागेत आणलं जाणार आहे. मुंबईतील भायखळ्यात असलेल्या वीर जिजामाता भोसले उद्यानात प्राण्यांना पाहण्यासाठी बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांची मोठी झुंबड उडत असते. मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे अशीच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र बिबट्यांच्या दर्शनासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.
'ड्रोगन' असं नर बिबट्याचं नाव असून त्याचं वय दोन वर्ष आहे. तर मादी बिबट्याचं नाव पिंटो असून ती तीन वर्षांची आहे. दोन महिन्यानंतर या बिबट्यांचं दर्शन मुंबईकरांना होणार आहे. राणीच्या बागेत 17 अद्ययावत पिंजऱ्यांची उभारणी सुरु असून लवकरच आणखी प्राण्यांचं आगमन उद्यानात होणार आहे.
'पेंग्विन'च्या आगमनानंतर मुंबईतील राणीच्या बागेत पर्यटकांची ये-जा वाढली आहे. जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार दररोज सुमारे दहा हजार, तर सुट्टीच्या दिवशी सुमारे 20 हजार पर्यटक पेंग्विन कक्षासह 'राणीची बाग' बघण्यासाठी येतात.