मुंबई : इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपासून सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये 2 ते 13 मे या कालावधीत एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. दिवासाला दोन सत्रांमध्ये मध्ये ही परीक्षा आजपासून सुरु होत आहे.


राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्या वतीने सीईटी परीक्षेचे नियोजन करण्यात येते. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमधील विद्यार्थीही या परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्राच्या 3 लाख 96 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

सीईटी सेलने उमेदवारांना परीक्षेदरम्यान काय करावे आणि काय करू नये? या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे ठरणार असून, विहित वेळेतच उमेदवारांनी केंद्रावर पोहोचावे, अशी माहिती सीईटी आयुक्त आनंद रायते यांनी दिली. परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे असून ते वैध असेल तरच उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांवरील छायाचित्र आणि स्वाक्षरी वैध ठरणार असल्याचे रायते यांनी सांगितले.

अर्जदाराच्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असेल, तर हमीपत्राचा नमुना अर्ज भरुन परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची महत्त्वाची सूचना उमेदवारांना करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी आवश्यक असल्याने, या वर्षी सीईटी कक्षामार्फत विद्यार्थी ही परीक्षा उत्तम पद्धतीने कसे देऊ शकतील, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रायते यांनी सांगितले.

आवश्यक कागदपत्रे
उमेदवाराचे आधार कार्ड/ ई-आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, चालक परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स), मतदार ओळखपत्र फोटोसह, बँक पासबुक, उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर गॅझेटेड ऑफिसरने जारी केलेला फोटो, ओळख पुरावा (उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर लोक प्रतिनिधींनी जारी केलेला फोटो), उमेदवाराला मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयाद्वारे जारी केलेले अलीकडील ओळखपत्र (तारखेनुसार वैध 2018-19)