कल्याण: हनिमून पॅकेज आणि फिरण्यासाठी टूर-ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जोडप्यांना सुमारे 7 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सागर वशिष्ठ असे या आरोपीचे नाव असून, कल्याण न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात सागरने भाड्याची जागा घेऊन अमियेबल क्लब टूर-ट्रॅव्हल्स आणि हनिमूनच्या पेकेजची एजन्सी सुरु केली. या ठिकाणी येणाऱ्या जोडप्यांना तो फिरण्यासाठी पॅकेज देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी जोडी 50 ते 60 हजार रुपये घेत होता. याबदल्यात तो त्यांना बनावट जेट एअरवेस या नावाने तिकीट आणि हॉटेलची नावे देत होता.
असाच प्रकार सुरु असताना कल्याण पूर्वेतील राहणारे अतुल बंगाळ व त्यांचे मित्र विनायक प्रजापती, ज्ञानेश्वर कर्पे यांची ही अशाच प्रकारे फसवणूक करून हजारो रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, बंगाळ यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्याला पोलिसांनी सागर विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.
दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.