मुंबई: राणे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असताना, जर त्यांनी नीट काम केलं असतं तर खोटा आरोप करण्याची वेळ आली नसती, असा टोला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोर्टात वेळ मागितला, मात्र कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी करत, खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. त्याला तावडेंनी प्रत्युत्तर दिलं.

तावडे म्हणाले की, ''कोर्टात शासनाने वेळ मागितल्याची माहिती त्याच दिवशी मी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधान केलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती योग्यच होती. त्यामुळे राणे खोटे आरोप करत आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना तावडे म्हणाले की, ''आरक्षण मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी आम्ही काढलेल्या पुराव्यांवर सुनावणीला आम्ही तयार होतो, यासंबंधी अधिकृत वकिलांनी माहिती दिल्यानंतरच वक्तव्य केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याच्या राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना तावडे म्हणाले की, मुख्यमंत्री खोटं बोलले नाहीत, अन् अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्न नाही असंही तावडे यावेळी म्हणाले. तसेच अविश्वास ठराव आणायचा असेल तर, तो विधानसभेत आणावा लागेल, विधानपरिषदेत आणता येत नाही. अशी कोपरखळीही त्यांनी राणेंना मारली.