भिवंडी : गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भिवंडीतील एम एम फूड्स या विनापरवाना सुरु असलेल्या कंपनीवर छापा टाकत तब्बल दोन लाख रुपये किंमतीचा खवा आणि चायनीज सॉस जप्त केला.


भिवंडी तालुक्यातील लोनाड हरणापाडा इथे एम एम फूडस ही कंपनी विनापरवाना सुरु असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांना मिळाली होती. यानंतर कोकण विभाग सहआयुक्त देसाई आणि सहाय्यक आयुक्त आर सी रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव आणि शंकर राठोड यांनी या कंपनीवर छापा मारला. या कंपनीकडे कोणताही शासकीय परवाना सापडला नाही. उलट या ठिकाणी दूध पावडर, वनस्पती तूप, आणि पाण्याच्या मिश्रणातून हलक्या प्रतीचा बनावट खवा बनवला जात असल्याचं आणि बाजारात बर्फी या ब्रॅण्डने 125 रुपये किलो दराने विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं.

तर चायनीज खाद्य पदार्थात हमखास वापरले जाणारे डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉसचेही उत्पादन सुरु असल्याचे आढळलं. टोमॉटो सॉस आणि सोया सॉस बनवताना टोमॅटोचा वापर न करता केमिकल कलर आणि भोपळा मिक्स करुन बनावट सॉस बनवले जात होते.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यानी कंपनी व्यवस्थापक सत्येंद्र रणजित सिंहकडे कागदपत्रांची मागणी केली असता तो दाखवू शकला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीतून 750 किलो मावा (किंमत 93750 रुपये), डार्क सोया सॉस 270 किलो (किंमत 30,600 रुपये) आणि रेड चिली सॉस 450 किलो (किंमत 54000 रुपये) असा एकूण 1,78,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसंच कंपनी विनापरवाना सुरु ठेवल्याप्रकरणी सील करण्यात आली आहे.

विनापरवाना कंपनी सुरु ठेवून पदार्थ अस्वच्छ वातावरणात बनवून विक्री करत असल्यामुळे कंपनीवर ही कारवाई केल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांनी दिली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईला मागणी असके, परंतु त्यात निकृष्ट दर्जाचा खवा वापरुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादकांविरोधात आणखी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाणार असल्याचं माणिक जाधव यांनी सांगितलं.