मुंबई: मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये (Mumbai House Price) अव्वाच्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तरीही मागील 10 महिन्यात मुंबईत 1 लाखांहून अधिक घरं विकली गेल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. सोबतच दसऱ्याचा विचार केला तर यात वृद्धीत होत मागील वर्षाच्या तुलनेत 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. येत्या दिवाळीत देखील आणखी घरांची विक्री होण्याची शक्यता असून राज्य सरकारला त्या माध्यमातून मोठा कर मिळण्याचा अंदाज क्रेडाई-एमसीएचआयनं (CREDAI MCHI) व्यक्त केलाय.
मुंबईत मागील 10 महिन्यात 1 लाख 4 हजार 852 घरांची विक्री झाली आहे. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत 9 हजार 221 कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील 9 दिवसात मुंबईत दसऱ्यात 4 हजार 594 घरांची विक्री करण्यात आली. मागील वर्षीच्या दसऱ्यात मुंबईत 3 हजार 343 घरांची विक्री करण्यात आली होती. यंदाच्या वर्षात घरांच्या नोंदणीत सुमारे 37 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय.
मागील 10 दिवसात राज्य सरकारच्या तिजोरीत घरांच्या विक्रीतून 435 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. मागील 10 दिवसात सरासरी दररोज 510 घरांची विक्री करण्यात आली आहे. नवी मुंबईत मागील 10 दिवसात 4 हजार 500 घरांची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबईतील घरांच्या नोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 270 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर महारेराकडून गृहप्रकल्पाची घोषणा
दिवाळी (Diwali) या सणांच्या मुहुर्तावर महारेराकडून (Maharera) गृहनिर्माण प्रकल्पांची (Housing Projects) घोषणा करण्यात आली आहे. यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा, असं आवाहन महारेरानं विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केलं आहे. सर्व विकासक आणि प्रवर्तकांसाठी हे पत्र महारेराच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आलं आहे. www.maharera.mahaonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा करत असतात, तसेच, अनेक नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना सुरुवात करत असतात. अर्थात यासाठी त्यांना महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, नोंदणी किंवा विक्री करता येत नाही. म्हणून नोंदणीक्रमांक लवकरात लवकर मिळावा असा ते आग्रह धरतात.
नोंदणीक्रमांक देण्याची महारेराची सुनिश्चित कार्यपद्धती आहे. विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांच्यामुळे ती सर्वांना माहितही आहे. यात महारेरा ग्राहकहित डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक प्रस्तावाची आर्थिक, कायदेविषयक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करतं. या विकासकांना लवकरात लवकर नोंदणी क्रमांक मिळावेत, यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. परंतु अपेक्षित कागदपत्रं सादर न केल्यास, त्रुटींची पूर्तता न झाल्यास यात अडचणी येऊ शकतात. याची जाणीव ठेवून विकासकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही महारेरानं केलं आहे.
महारेरा ही महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MahaRERA), राज्य सरकारच्या अधिसूचना क्रमांक 23 द्वारे रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम 2016 (RERA) अंतर्गत स्थापन करण्यात आलं. रेरा (RERA) अंतर्गत राज्याचे नियम महाराष्ट्र रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) (रिअल इस्टेट प्रकल्पांची नोंदणी, रिअल इस्टेट एजंटची नोंदणी, व्याज दर आणि वेबसाईटवर प्रकटीकरण) नियम, 2017 म्हणून तयार करण्यात आलं होतं.
ही बातमी वाचा: