मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. "आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं," असं परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्या, त्या अकाऊंटची चौकशी सुरु असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तसंच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचं सिंह यांनी नमूद केलं.
सत्य कायमच समोर येतं: परमबीर सिंह
"एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलनेही सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला सोपवला. कुपर हॉस्पिटल, फॉरेन्सिक एक्स्पर्ट आणि आमच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. आता एम्स डॉक्टरांच्या पॅनलनेही तसाच अहवाल दिल्याने आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सत्य कायमच समोर येतं," असं परमबीर सिंह यांनी सांगितलं. "स्वार्थासाठी काहींनी आमचा तपास आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी नक्की मोहीम राबवल्या होत्या. आम्हाला आमच्या तपासावर विश्वास होता, सत्यावर विश्वास होता आणि सत्य समोर येतंच," असंही ते म्हणाले.
बदनामी करणाऱ्या फेक अकाऊंट्सचा तपास सुरु
"सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते, त्यातून फक्त शिवीगाळ केला जात होता, चुकीची माहिती पसरवली जात होती. सायबर एक्स्पर्ट याचा तपास करत असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल," अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. "तसंच काही मीडिया हाऊसनेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलिन केली होती. त्यांच्याविरोधात काही निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टही त्यावर योग्य निर्णय देईल," असं परमबीर सिंह पुढे म्हणाले.
कुटुंबीयांनीही आत्महत्या असल्याचंच म्हटलं होतं
कुटुंबीयांनीही सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं, असं मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले. "14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 16 जून रोजी त्याच्या कुटुंबीयांचे जबाब आम्ही नोंदवले होते. सुशांतचे वडील, त्याच्या तिन्ही बहिणी, मेहुण्याचा जबाब नोंदवला होता. त्या जबाबात त्यांनी सुशांतने आत्महत्या केली असून आमची याबाबत कोणतीही तक्रार नाही. त्यानंतरही अनेक वेळा आम्ही त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं, परंतु कोणीही आलं नाही. यानंतर 40-45 दिवसांनी त्यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यातही त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं होतं. तिथेही आरोप आत्महत्येचाच होता. कुटुंबातील कोणीही हत्येचा आरोप आमच्याकडे केला नव्हता. शिवाय हत्येचे पुरावेही नव्हते. तसंच कुपर हॉस्पिटल किंवा फॉरेन्सिक एक्स्पर्टनाही अशाप्रकारचं काही आढळलं नव्हतं. अशाच प्रकारचा अहवाल एम्सचाही असल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलेलं नाही."