मुंबई : "हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही," अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांशी ऑनलाईन मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेकडून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. भोंग्यांवर पहिला आक्षेप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
"विरोधकांना कळलं पाहिजे की, शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेनेची ताकद काय असते. ह्यांना मराठीबद्दल प्रेम नाही, हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही, फक्त स्वतःवर प्रेम आहे. हे आपल्या कर्माने मरणार आहेत, बाकी काही करायची गरज नाही," असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा आहे, यापुढेही राहिन : उद्धव ठाकरे
"शिवसेनेच्या कामात सातत्य ठेवा. आपल्या कार्यकर्त्याला रोजगार मिळतो आहे का ते पाहा. आपल्या कार्यकर्त्याच्या उदरनिर्वाहाकडे लक्ष द्या. शिवसेनेचा भगवा घराघरांत पोहोचवा. तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा आहे आणि यापुढेही उभा राहिन," अशा विश्वास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिला.
हिंदुत्वावर बोलायची आमची लायकी नाही तर तुम्ही पण बोलत नाही : संदीप देशपांडे
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरे काय बोलताय त्यांचं कळतं नाही. उठसूठ मनसेवर बोलायला शिवसेनेला काय झालं कळेना.आता हिंदुत्वावर बोलायची आमची लायकी नाही तर तुम्ही पण बोलत नाही. एनसीपीसोबत जाऊन नवे पुरोगामीत्व तुम्ही स्वीकारलं आहे. भोंगा हा मुद्दा बाळासाहेबांचा आहे मान्य तर तुम्ही भोंगा काढण्याबाबत का बोलत नाही. आमची सभा आणि हिंदुत्वाची लाट पाहून शिवसेनेच्या पोटात दुखतंय आणि त्यातून हे सगळं सुरु आहे," असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
भाजप, मनसेवर तुटून पडा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (29 एप्रिल) वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या शिवसेना प्रवक्त्यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या होत्या. शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असा सामना राज्यात रंगल्याचं चित्र आहे.अशातच मशिदींच्या भोंग्यावरुन राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी हायजॅक केल्याची भावना असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा संदेश दिला आहे.
- Uddhav Thackeray : भाजप, मनसेचे हिंदुत्व बोगस, त्यांच्यावर तुटून पडा; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश
- भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय, संजय राऊतांचा हल्लाबोल
- पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
- Kolhapur : शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- Uddhav Thackeray : सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे