मुंबई : "रुपारेलच्या कट्ट्यावर आमची ओळख झाली. शिरीष पारकरने आमची ओळख करुन दिली. तेव्हापासूनच राज माझ्या मागे होता. तो कितीही सांगेल की नाही पण तोच माझ्या मागे लागला होता," अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आपली प्रेमकहाणी सांगितली. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात मिस्टर अॅण्ड मिसेस ठाकरे यांच्याशी विविध मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा रंगल्या. त्यावेळी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा या मुद्द्यांपासून राज-शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी, आई-बाबा म्हणून निभावलेली भूमिका ते आजी-आजोबा झाल्यानंतरचा अनुभव त्यांनी शेअर केला.
'माझा कट्टा'ची दशकपूर्ती, दिग्गजांसोबत 'महाकट्टा'
माझा कट्टा, गेलं दशकभर ज्या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं, ज्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा उलगडा झाला असा लोकप्रिय माझा कट्टा आज दशकपूर्ती करत आहे. कट्ट्याची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज (30 एप्रिल) आणि उद्या (1 मे) माझाचा महाकट्टा रंगणार आहे. या दोन दिवसात माझाच्या या महाकट्ट्यावर विविध क्षएत्रातील दिग्गज, मान्यवर हजेरी लावणार आहेत. या महाकट्ट्याची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर करण्यात आली. कट्ट्यावरच्या अनौपचारिक गप्पांची सुरुवात झाली ती 14 फेब्रुवारी 2012 साली राज ठाकरे यांच्यासोबतच. त्यामुळे आज कट्ट्याची दशकपूर्ती साजरी करताना ते पुन्हा पत्नीसह कट्ट्यावर जोडीने आले आहेत.
जोडीने मुलाखत देण्याची राज आणि शर्मिला ठाकरे यांची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी त्यांनी ओळख झाल्यापासून आई-बाबा, आजी-आजोबा म्हणून आलेले अनुभव शेअर केले. दोघांची ओळख कशी झाली याबाबत विचारलं असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "मी रुपारेल कॉलेजमधून पास झाल्यानंतर नोकरी करत होते. त्यावेळी रविवारी मित्रमैत्रीणी भेटतात तसे आम्ही भेटायला गेलो होतो. तेव्हा राज त्याच्या मित्रांसोबत रुपारेलमध्येच होता. त्यावेळी शिरीष पारकर त्याच्यासोबत होता. शिरीष पारकरने आमची ओळख करुन दिली होती. तो आमचा कॉमन फ्रेण्ड होता. तेव्हापासून हा माझ्या मागे होता. तो कितीही सांगेल की नाही पण तोच माझ्या मागे लागला होता." "त्यावेळी लॅण्डलाईनवर फोन करायचो, बोलायचो. आमचं लग्न लहान वयात झालं. अमित झाल्यानंतर त्याला हातात घेतलेल्या फोटोत राज फार लहान दिसत होता," असं शर्मिला यांनी गमतीत म्हटलं.
राज ठाकरे म्हणाले की, "शर्मिला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे पहिल्यांदा लग्नाचा विचार तिच्या वयाचा झाला, माझ्या वयाचा नाही. तिच्या बाबांनाही माहित नव्हतं की मी तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. त्यामुळे दर वाढदिवसाला आठवून कॅल्क्युलेशन करुन सगळं सतत सांगावं लागायचं." "बाबांना डाऊट होता म्हणून ते दरवर्षी विचारायचे की आता तू किती वर्षाची झालीस, तो किती वर्षाचा झाला," असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
"घरात लग्नाला विरोध झाला नाही. बाळासाहेब, माझे वडील, आणि मोहन वाघ चांगले मित्र होते. बाळासाहेब अमेरिकेला गेले होते तेव्हा सगळ्यात महागडी गोष्ट कोणासाठी आणली असेल तर ती शर्मिलाच्या बाबांसाठी. बाळासाहेबांनी त्यांना हॅजलब्लेड कॅमेरा आणला होता. त्यामुळे त्यांची घट्ट मैत्री होती. मोहन वाघांमुळे बाळासाहेब आणि पप्पा हिला ओळखत होते. पण हिची आणि माझी ओळख असल्याचा प्रश्नच नव्हता, असं राज यांनी सांगितलं. "तर राजची बहिण माझी मैत्रीण होती. तिला भाऊ आहे हे देखील मला माहित नव्हतं," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.