मुंबई: शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असा सामना राज्यात रंगल्याचं चित्र आहे. अशातच मशिदींच्या भोंग्यावरुन राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी हायजॅक केल्याची भावना असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा संदेश दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. 


उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची एक बैठक वर्षा या निवासस्थानी बोलावली होती. त्यामध्ये हा आदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याची टीका भाजप आणि मनसेकडून केली जात आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींच्या भोंग्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवावेत अन्यथा त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावरून येत्या 1 मे रोजी त्यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी हायजॅक केल्याचं चित्र दिसत होतं. 


राज ठाकरे तसेच भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच 1 मे रोजी उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असून त्यामध्ये आपण विरोधकांचा समाचार घेऊ असं त्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, या बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. 


महत्त्वाच्या बातम्या: