Aaditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही. हिंदुत्व आमच्या मनात आणि रक्तात आहे. अयोध्येची तारीख लवकरच तारीख जाहीर करणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथे प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण 'बायोम थीम'वर आधारित उद्यान आणि सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र यांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरमधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या कामामुळे विजय झाला. कुणाला पोट दुखी होऊ नये. आम्ही एक एक राज्य जिंकणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभेतील जागा जिंकल्याबद्दल मविआच्या जयश्री ताई जाधव यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी मतदान केल्याबद्दल मतदारांचे खूप खूप आभार मानतो. महाविकास आघाडी एकजूट होऊन महाराष्ट्राचा शाश्वत विकास करत आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा आहे, हे आजच्या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले. महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीसाठी एकत्रितपणे काम केल्याबद्दल मी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे लवकरच आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दुजोरा दिला. लवकरच आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करु, असे ते म्हणाले. काल माझी आणि संजय राऊत यांची चर्चा झाली अयोध्येत जाण्यासाठी विचार सुरू होते लवकरच अयोध्येत जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. मी त्यांच्यावर काही बोलतच नाही. रवी राणा यांच्याकडे मी बघत देखील नाही. वेगवेगळे रंग लावून हिंदुत्व होत नसतं. आमचे हिंदुत्व कायम आहे, असे ठाकरे म्हणाले.