Raj Thackeray Majha katta : मशिदीवर किंवा अन्य ठिकाणी जे भोंगे लावले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला त्रास होतो. भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. हा फक्त मशिदीवरील भोंगे असा विषय नाही. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. एक, दोन दिवस आपण समजू शकतो मात्र, 365 दिवस जर या गोष्टी सुरु असतील तर ते योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातील पहिला संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी साधला. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला. 




 
भोंगा या विषयाकडे धार्मिक म्हणून न पाहता सामाजिक विषय म्हणून पाहावे, असे सामाजिक विषय खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. एसटीचा संपाकडे देखील आपण राजकीय समजतो पण तो काही राजकीय नाही, तो कर्मचाऱ्यांच्या पगावरवाढीच्या संदर्भात असल्याचे ठाकरे म्हणाले. इतक्या वर्षात आम्ही अजूनही बदललो नाहीत. आम्ही आजही तेच सांगत आहोत की, आम्ही रस्ते देऊ, आम्ही पाणी देऊ, वीज देऊ, शिक्षण देऊ, आरोग्य देऊ. एवढ्या वर्षात या मूलभूत समस्याच ओलांडून पुढे गेलो नसल्याचे राज म्हणाले. त्यामुळे काम करणाऱ्यांना नापास केले आणि काम न करणाऱ्यांना जर पास केले तर ही कामे होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले.


अचानक हा विषय घेतला नाही


मी अचानक भोंग्याचा विषय काढला नाही. यापूर्वी देखील काढला होता असे राज म्हणाले. आम्ही आमच्या कानाला का त्रास करुन घ्यायचा. म्हणून हा विषय थांबला पाहिजे. एकाच धर्मियांना बंधने सांगणार का तुम्ही? असा सवालही त्यांनी केला. भोंग्याचा त्रास हा फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिम बांधवांना देखील होतो. घरात लहान मुले, महिला असतात, वयस्कर लोक असतात, अभ्यास करणाऱ्या मुलांना याचा त्रास होतो असे राज ठाकरे म्हणाले. गणपतीच्या वेळेस ज्यावेळी लाऊडस्पीकर लावले जातात त्याचा देखील त्रास होतो. परंतू ही अॅक्शनला रिअॅक्शन असल्याचे राज म्हणाले.


राज ठाकरे भाषणाची तयारी कशी करतात


राज ठाकरे यांचे वाचन खूप आहे. ज्यावेळी सभा असते त्यावेळी त्यांच्या रुममध्ये आम्ही कोणीही जात नसल्याचे शर्मिला यांनी सांगितले. कारण ते वाचून कधीच भाषण देत नाहीत.  त्यांचे भाषण उत्स्फुर्त असते असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.


ज्या दिवशी माझी सभा असते, त्यावेळेला माझ्या हात-पायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात. कारण मला माहिती नसते की मी काय बोलणार ते असे राज यांनी सांगितले. 100 गोष्टी जरी मला माहित असल्या तरी त्यावेळी माझ्या तोंडून काय येणार हे मला माहित नसते. काही वेळेला नोट्स काढलेल्या असतात, पण माझे लक्ष जात नसल्याचे त्यांनी सांगितले. बोलतो त्यावेळी मला काही दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.  जर एखादा महत्त्वाचा मुद्दा राहिला असेल तर मागून सांगितले जाते असेही ते म्हणाले.




शर्मिला ठाकरे यांनी सांगितला राज यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा


महागाई आणि भोंगा हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. महागाई ही राज्य आणि केंद्र सरकार या दोघांमुळेही होत असल्याचे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. महागाई ही तर समस्या आहेच, पण भोंग्याचा देखील त्रास होत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, शिवसेनेत असताना देखील राज ठाकरे हे आक्रमक होते असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. लग्नाच्या आधीपासूनच त्यांचा स्वभाव मला माहित होता, त्यामुळे मला त्यांची भीती वाटली नसल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. परेलला मैत्रिणीकडे गेले असताना, त्यावेळी राज ठाकरे तिकडे त्यांच्या मित्रांबरोबर होते. त्यावेळी राज यांचे मित्र शिरीष पारकर यांनी राज यांची ओळख करुन दिली असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. तेव्हापासून राज माझ्या मागावर होते असा उल्लेखही शर्मिला ठाकरे यांनी केला. 


बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडिल हे शर्मिला ठाकरे यांच्या वडिलांचे खास मित्र होते, त्यामुळे आमच्या लग्नाला विरोध झाला नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांनी अनेक लोकांसाठी विविध वस्तू आणल्या होत्या. मात्र, सर्वात महागडी वस्तू बाळासाहेब ठाकरे यांनी शर्मिल ठाकरे यांच्या वडिलांसाठी आणली होती. बाळासाहेबांनी दोन कॅमेरे घेतले होते एक उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर दुसरा शर्मिला ठाकरे यांच्या वडिलांसाठी.  शर्मिला ठाकरे यांच्या वडिलांसाठी घेतलेला हॅसलब्लॅड कॅमेरा महागडा होता असे राज यांनी सांगितले. दरम्यान, त्यावेळी शर्मिला आणि माझी ओळख देखील नव्हती असे राज म्हणाले. राज ठाकरे यांची बहिण माझी मैत्रीण होती. वडिल ज्यावेळी पार्ट्यांनी जात होते, त्यावेळी ते आम्हाला घेऊन जात. त्यामुळे राज यांच्या बहिणीची ओळख झाली होती असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.  


तेव्हा लहान मुलांना वेळ देता आला नाही


मी लवकर आजोबा झालो याचा आनंद आहे. आता त्या लहान मुलांना खेळवता येईल असे राज ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे ज्यावेळी लहान होते, त्यावेळी मी खूप बाहेर असायचो. दोन दोन महिने बाहेर असायचो. दौरे चालू असायचे. मी सतत फिरतीवरती असायचो. मी एकदा दैऱ्यावरुन घरी आलो त्यावेळी लहान असणाऱ्या अमितला कडेवर घेतले. त्यावेळी शर्मिला यांनी अमितला बाबा कुठे आहेत असे विचारायला सांगितले होते. त्यावेळी अमित यांनी भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बोट केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मुलांना जास्त वेळ देता आला नाही आता नातवंडाना वेळ देता येतो असे ठाकरे म्हणाले. ज्यावेळी अमितला मुलगा झाल्याचे समजले त्यावेळी खूप आनंद झाल्याचे शर्मिला यांनी सांगितले. मला समजल्यानंतर मी मोठ्याने किंचाळले होते असेही त्या म्हणाल्या. अमितला बाळ झाल्याचा सर्वात जास्त आनंद झाला. आज्जी आजोबा होण्यासारखे सुख कशातच नसल्याचे त्यांनी सांगितले.


आम्ही दररोज चित्रपट बघतो


दिग्गज लोक आमच्या घरी येत होते. मोठ्या लोकांमध्ये आम्ही वाढलो. त्याचा फायदा ठाकरे यांच्या घरी आल्यावर झाल्याचे शर्मिला यांनी सांगितले. आम्ही दररोज रात्री एकत्र चित्रपट बघतो. पण राज ठाकरे यांच्या आवडीचा चो चित्रपट असतो असे शर्मिला यांनी सांगितले. थोड्या वेळानंतर राज झोपतात पण मी पूर्ण चित्रपट बघते असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाचा चेहरा समाजाकडे असावा आणि पाठ घराकडे असावी हे ओशे यांच्या वाक्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे घर सांभाळणाऱ्या व्यक्तिला त्रास देऊ नये असे राज म्हणाले. 


शर्मिला ठाकरे आणि  माझी बहिण या दोघी एकाच बँकेत नोकरीला होत्या असे राज यांनी सांगितले. 1993 ला ज्यावेळी शिवसेना भवनाजवळ बॉम्बस्फोट झाले त्यावेळी या दोघी बँकेत होत्या असे राज यांनी सांगितले. सासू सुनेचं आणि नंदेसोबत असणारे नाते खूपच प्रेमळ असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. माझ्या सासूबाईंनी मला सगळा स्वयंपाक शिकवला असल्याचे त्यांनी सांगितले.


मैदानाची भाषा बोल असा बाळासाहेबांनी सल्ला दिला 


फी वाढीच्या विरोधात मी मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषण झाल्यानंतर कोणतरी माझ्याकडे आले आणि त्याने मला सांगितले की माँ आली आहे मोर्चाला. मी गेलो तर ती गाडीत बसली होती. त्यावेळी माँ ने मला गाडीत बसवले, काका वाट बघत असल्याचे सांगितले. घरी आलो त्यावेळी बाळासाहेब बसले होते. बाळासाहेब म्हणाले तुझे भाषण ऐकले. त्यावेळी एक जणाने माझे भाषण चालू असताना स्पीकर ऑन करुन बाळासाहेबांना कॉल करुन माझे भाषण ऐकवल्याचे राज यांनी सांगितले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, माझ्या बापाने जे मला सांगितले ते मी तुला सांगतो. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल असे बाळासाहेबांनी सांगितले. आपण किती हुशार आहोत हे न सांगता लोक कशी हुशार होती हे भाषणातून सांग असे त्यांनी सांगितल्याचे राज यांनी सांगितले. दुसरी गोष्ट मी आज काय बोललो त्यापेक्षी मी आज काय दिलं याचा विचार करुन भाषण कर असा सल्ला बाळासाहेबांनी दिल्याचे राज यांनी सांगितले.  
    
माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरुन माझे आजोबा काढू नका. ते कर्मकांडाच्या विरोधात होते, देव धर्माच्या विरोधात नव्हते. धर्मांध हिंदू मला नको आहेत, धर्माभिमानी मला हवे आहेत असे राज ठाकरे म्हणाले. ज्यांचे धर्मावरती प्रेम आहे, तोच माणूस धर्मातील चुकीच्या गोष्टी सांगू शकतो. माझे विचार हे आजोबांच्या विचारांच्या जवळ आहेत, असे राज म्हणाले. मला त्यांचा चार वर्ष सहवास लाभल्याचे राज यांनी सांगितले. 


नवीन राजकीय पक्ष काढणार हे मनात नव्हते


ज्यावेळी मी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी नवीन राजकीय पक्ष काढणार असे टरवले नव्हते. बाळासाहेब असताना त्यांच्यासमोर नवीन राजकीय पक्ष स्थापन करणे ही गंमत वाटली का? माझ्या मनातही हे नव्हते असे राज ठाकरे यांनी सांगितले. 2000 ते 2002 या काळात मी पूर्ण राजकारणातून बाजूला गेलो होतो. कोणत्याही शिवसेनेच्या कार्यक्रमाला जात नव्हतो. यातून बाजूला होण्याचा विचार केला होता असे राज म्हणाले. पण काही जणांनी मला महाराष्ट्रात जाऊ असे सांगितले. त्यानंतर मला प्रत्येक जिल्ह्यातून ज्या प्रकारे पाठिंबा मिळत गेला त्यातून मला वाटले की जनतेच्या माझ्याकडून काही अपेक्षा असतील तर पक्ष काढावा असे राज म्हणाले. देशातील मशिदीवरील लाउडस्पिकर घालवायचा असे तर देशातील सर्व राजकीय पक्षांनी विचार करणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. हा मुंबईचा विषय नाही असे राज म्हणाले.


आमिर, सलमान भेटतात त्यावेळी मराठीत बोलतात


लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांच्याशी निर्माण झालेले नातं हे शर्मिला ठाकरे यांच्या वडिलांमुळे तयार झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. लता मंगेशकर यांची पहिली भेट ही शर्मिला यांच्या वडिलांमुळेच झाली. आशा भोसले, सचिन तेंडूलकर यांच्याशी बोलत असताना त्यामध्ये राजकारण कधीच नसते. त्यांनाही माहित असते की राजकीय फायदा करुन घेण्यासाठी मी कोणती गोष्ट करणार नाही असे राज म्हणाले. मला त्याची गरज नाही. त्यांच्याकडून आपल्याला जेवढे मिळेल ते आपण घेतले पाहिजे. देशहितासाठी चांगला निर्णय घ्यायचा असेल आणि त्यामुळे आजुबाजूंच्या लोकांशी असणारे संबंध बिघडणार असतील तर बिघडू देत असे आजोबा म्हणत होते असे राज म्हणाले. संबंध तुटले तर तुटू दे भूमिकेपासून दूर जायला नको असे ते म्हणाले. मराठीच्या भूमिकेमुळे इतर भाषिक लोकांना मराठी कळाले. आमिर खान, अमिताभ बच्चन मराठीत बोलायला लागल्याचे राज ठाकरे म्हणाले. आमिर, सलमान ज्यावेळी भेटतात त्यावेळी ते मराठीत बोलतात असे राज म्हणाले.