नवी मुंबई : मोबाईल गेमच्या नादी लागून बदलापूरच्या एका अल्पवयीन मुलानं घर सोडून थेट गोवा गाठल्याचा प्रकार समोर आलाय. या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.


बदलापूरच्या पाटीलपाडा परिसरात हा 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे आईवडील दोघेही नोकरी करत असून घरची परिस्थितीही चांगली आहे. या मुलाला लॉकडाऊनच्या काळात मोबाईल गेमचं व्यसन लागलं. त्यातूनच त्याला डिसकॉर्ड नावाच्या एका गेमिंग आणि चॅटिंग ऍपची माहिती मिळाली. या ऍपवर त्यानं परफेक्ट प्लॅनिंग नावाचा एक ग्रुप तयार करत काही समविचारी मित्रांना त्यात अॅड केलं. 


या ग्रुपमधील सर्वांनी मिळून घर सोडून स्वच्छंदी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आणि थेट गोव्याला जाण्याची तयारी केली. त्यानुसार बदलापूरचा हा अल्पवयीन मुलगा 31 ऑक्टोबर रोजी घर सोडून बसने गोव्याला गेला. तिथे परराज्यात राहणारा त्यांच्याच ग्रुपमधला आणखी एक अल्पवयीन मुलगाही घर सोडून आला होता. या दोघांनी आधी तिथे पोहोचून ग्रुपमधील इतर सदस्यांसह राहण्यासाठी काही अनाथाश्रम सुद्धा शोधले. 


दुसरीकडे मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली. मुलगा अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. या मुलाच्या फोनमध्ये सिमकार्ड नसल्यानं तो जिथे वायफाय मिळेल, तिथून घरच्यांना आपली खुशाली कळवत होता. त्यामुळे हा मुलगा नेमका कुठे आहे, हे शोधण्यासाठी पोलिसांनी आयपी अॅड्रेस शोधत मुलाला शोधायला सुरुवात केली. त्यानुसार गोव्याच्या कलंगुट भागात हा मुलगा आढळून आला. 


गोवा पोलिसांच्या मदतीने या मुलाला बदलापूरला सुखरूप परत आणण्यात आलं. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर या मुलानंही आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य करत तरुणांनी मोबाईल गेम्सच्या आहारी न जाण्याचं आवाहन केलंय.


महत्वाच्या बातम्या :