मुंबई: वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील काही ठिकाणचे एसटी आगार बंद आहेत. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. या संपकरी, आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांच्यातील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा पत्रातून दिला आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. 






कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, 'एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिन करा' ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले. 


सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची आज आवश्यकता असून 'एसटी कर्मचारी-कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे भान बाळगण्याची आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.