नवी मुंबई : ऑनलाईन बँक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचं सध्या समोर येत आहे. अशाच प्रकारची एक घटना नवी मुंबईत समोर आली आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने कर्जाचं आमिष दाखवून गोरगरीबांची कागदपत्रं गोळा केली. त्यानंतर नियमात बसत नाही असं सांगून त्या लोकांच्या नावे परस्पर आरबीएल बँकेतून कर्ज उचललं. बँकेतून हप्त्यासाठी तगादा सुरु झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं.


काय आहे प्रकरण?
संदीप ढमढेरे हा तरुण लॉकडाऊनपूर्वी गाडी चालवून आपलं पोट भरत होता. परंतु अचानक लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी संदीपने कर्ज मिळण्यासाठी हालचाल सुरु केली. त्या अनुषंगाने त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इथूनच या ऑनलाईन फ्रॉडला सुरुवात झाली.


संदीपने कर्जासाठी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यानंतर नवी फायनान्स नावाच्या कंपनीतून आपण बोलत असल्याचं सांगत एका महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. कर्जासाठी सगळी कागदपत्रे मागवून घेतली. त्यानंतर तुमचा सिव्हिल स्कोअर कमी असल्याचं सांगत मित्रांच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्याने मित्रांची माहितीही पाठवली. त्यानंतर परस्पर कर्ज उचलून लोकांची फसवणूक केली.


संदीपसारखेच इतरही त्याचे मित्र होते ज्यांना लॉकडाऊनमध्ये कुटुंब चालवण्यासाठी पैशांची गरज होती. याचाच फायदा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी उचलला आणि सर्वसामान्य नागरिकांची हातोहात फसवणूक करण्यास सुरुवात झाली.


पाच सहा दिवसांत देखील कर्जाची रक्कम न आल्यामुळे अखेर संदीपने कर्ज देणाऱ्या कंपनीच्या ऑफिसला जाऊन भेट दिली तर त्या ठिकाणी असं कोणतं ऑफिसचं नसल्याचं समोर आलं. तसंच जी महिला संपर्क करत होती तिने देखील आपला फोन बंद केला होता. त्यानंतर या सर्वांना आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं.


नवी फायनान्स नावाच्या कंपनीकडून या सर्व तरुणांची नवी मुंबईतील नेरुळ येथे असणाऱ्या आरबीएल बँकेच्या शाखेत बनावट खाती तयार करण्यात आली होती. यावर पत्ता एका व्यक्तीचा, फोटो दुसऱ्या व्यक्तीचा आणि आधार कार्ड नंबर तिसऱ्याच व्यक्तीचा वापरण्यात आला होता. तरीही या सर्व तरुणांची आरबीएल बँकेत खाती तयार करण्यात आली होती. त्यामुळे बँकेतील व्यक्ती यामध्ये सहभागी तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.


आता या सर्व तरुणांची अशी परिस्थिती आहे की एकीकडे हाताला काहीच काम नाही आणि दुसरीकडे बँकेकडून न घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सातत्याने तगादा सुरु आहे. या प्रकरणी तरुणांनी ज्या बँकेत खाती उघडण्यात आली आहेत त्या आरबीएल बँकेशी संपर्क साधला असता तुम्ही गुन्हा दाखल करा तरच तुम्हाला माहिती देऊ असं सांगण्यात येत आहे.


या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी भाजपने पुढाकार घेऊन आरबीएल बँकेला आणि पोलीस ठाण्याला निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची पाच दिवसांत चौकशी करा अन्यथा तुमच्या विरोधात मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.


दिवसेंदिवस अशा अनेक ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. यामध्ये कधी अॅपच्या माध्यमातून तत्काळ कर्ज देण्यात येईल, तुमचे आधार आणि पॅनकार्ड पाठवा आणि त्वरित 5 ते 6 लाखांपर्यत कर्ज मिळवा असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन कर्जाच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींना आधार कार्ड आणि पॅनकार्ड तर शेअर केलं नाही ना याची खातरजमा करुन घ्या.