मुंबई : बँक तसेच वेगवेगळ्या अॅपच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून केवायसी (वैयक्तिक तपशीलांची नोंदणी) अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आर्थिक व्यवहार बंद होऊ नये, तसेच वेळ वाचावा यासाठी अनेकजण फोनवरच माहिती देत असल्याने ही फसवणूक वाढत आहे. मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये दररोज या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत.
वांद्रे परिसरात टिश्यू पेपरचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाला मोबाईलवर 'पेटीएम टीम' या नावाने एसएमएस आला. त्यात पेटीएम खाते सुरळीत सुरु ठेवण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास खाते 24 तासांच्या आत बंद होईल, असा मजकूर होता. बहुतांश व्यवहारासाठी हा व्यावसायिक पेटीएमचा वापर करत असल्याने गैरसोय होऊ नये, यासाठी त्याने मेसेजमधील क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी त्याला सपोर्ट नावाचं अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलं. या अॅपद्वारे फोन नंबर, संगणक परस्पर हाताळणे शक्य होते. हे अॅप डाऊनलोड करताच व्यावसायिकाच्या खात्यातून साडेपाच हजार रुपये ट्रान्सफर झाले. पैसे पुन्हा खात्यावर येतील, मात्र त्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम खात्यात दोन रुपये भरा, असं व्यावसायिकाला सांगण्यात आलं. त्यानंतर व्यापाऱ्याने पेटीएममध्ये पैसे भरताच काही मिनिटात व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये ट्रान्सफर झाले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मोबाईल बंद केला. फसवणूक झाल्याचे कळताच व्यावसायिकाने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे या ऑनलाईन भामट्यांचे प्रमुख लक्ष्य असल्याचे फसवणुकीच्या घटनांमधून दिसून येते. सरसकट हे भामटे 100-200 लोकांना केवायसी अपडेटचे मेसेज मोबाईलवर पाठवतात. यातील प्रामुख्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिक बँक खाते अगर अॅपची सेवा बंद होईल, या भीतीने मेसेजमधील क्रमांकावर संपर्क करतात आणि त्यातूनच या भामट्यांचे फावते.
अलिकडील काही फसवणुकीचे गुन्हे
- कांदिवलीच्या शाह यांना पेटीएम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून टीम व्हिवर हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि 1 लाख 90 हजारांचा त्यांना गंडा घालण्यात आला.
- हिरा झंमतानी यांना पेटीएम अॅप ब्लॉक होईल, असं सांगून त्यांच्या खात्यातील 3 लाख 90 हजार परस्पर काढून घेण्यात आले.
- वांद्रे येथील सुलतान विराणी या ज्येष्ठ नागरिकाला अशाच प्रकारे 53 हजारांचा गंडा घालण्यात आला.
- पवईतील प्रियांका गुप्ते यांना पेटीएममध्ये माहिती भरुन एक-दोन रुपये भरण्यास सांगितले आणि 14 हजारांची फसवणूक करण्यात आली.
- ज्येष्ठ नागरिक सुकुमार नायर यांना गुगल प्लेवरुन दुसरे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून 99 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली.