नवीन कांदा 100 रुपये तर जुना कांदा 120 रुपये किलोने एपीएमसी मार्केटला विकला गेला आहे. एपीएमसीत दर वाढल्याने किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा आता 130 च्यावर जाण्याची शक्यता आहे. नविन कांद्याचे पिक येण्यास फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याने पुढील दोन महिने कांद्याचे दर चढेच राहणार आहेत. दरम्यान बाहेरील देशांतील ईजिप्त आणि तुर्कीवरुन आलेला कांदा मुंबईबाहेर विक्रीला जात असल्याने येथील दर कमी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
Onion Rates Hike | कांद्याचं उत्पादन घटल्याने नव्या कांद्याला यंदा चांगला भाव | नाशिक | ABP Majha
रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवण्याचा केंद्राचा विचार
रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवठा करण्याचा विचार केंद्र सरकार करतं आहे. केंद्राच्या मुख्य सचिवांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाली. यावेळी कांद्याच्या साठवणूक आणि दराबद्दल आढावा घेण्यात आला. राज्य सरकारला कांद्याचा पुरेसा अतिरिक्त साठा करण्याच्या सूचनाही केंद्राच्या सचिवांनी दिल्या आहेत. शिवाय, व्यापाऱ्यांवर कांद्याच्या साठवणुकीचे बंधन घालून साठेबाजांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. इजिप्तकडून आयात केलेला सहा हजार नव्वद मेट्रिक टन कांदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात दाखल होणार आहे. याशिवाय तुर्कीकडून अकरा हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असून हा कांदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल होईल.
बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रार्दुभाव
एकीकडे कमी उत्पादनामुळे कांदा दहा हजारी पार करुन गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतांना दुसरीकडे मात्र तोच कांदा उत्पादक शेतकरी बदलत्या वातावरणामुळे त्रस्त झाला आहे. आधिच अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. लागवडीनंतर कांदा मोठा होऊ लागताच सकाळी पडणारे दवं, त्यानंतर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पाती पिवळ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा वाढीवर परिणाम होऊन कांद्यावर करपा, मावा या रोगांचा प्रार्दुभाव वाढून कांदा खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.