मुंबई : "मी किंवा माझ्या भावाने कर्जच घेतलं नाही. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. शिवाय व्हायरल होणारे कागदपत्रे बनावट आहेत," असं उत्तर अभिनेता रितेश देशमुखने मानवाधिकार संघटना मानुषीच्या संस्थापक आणि प्रोफेसर मधू पौर्णिमा किश्वर यांना दिलं आहे. मधू किश्वर यांनी अभिनेता रितेश आणि त्यांचे बंधू आमदार अमित देशमुख यांनी 4 कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा आरोप केला होता. याच आरोपांना रितेशने ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात रितेश आणि अमित देशमुख बंधूंचा सात-बारा उतारा त्यावरील कर्जाच्या नोदींसह वायरल होत आहे. मधू किश्वर यांनी हीच इमेज रितेश देशमुख यांना टॅग करुन प्रश्न विचारला होता. परंतु ते ट्वीट मधू किश्वर यांनी डिलीट करुन रितेशची माफी मागितली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत फडणवीस सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही होती. त्यावेळी भाजप समर्थक सरसकट कर्जमाफी केली तर काँग्रेसच्या नेत्यांना अनावश्यक लाभ मिळेल हे पटवून देण्यासाठी देशमुख बंधूंच्या सात-बाराचा फोटो वायरल करायचे. तेव्हाही किंवा आता कोणीही याची सत्यता पडताळणी केली नव्हती. मात्र आता रितेशने हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे.

रितेश देशमुखने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "मधू किश्वरजी, वायरल होणाऱ्या सात-बाराचा फोटो बनावट आहे. मी किंवा माझ्या भावाने कधीही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेण्याचा प्रश्नच येत नाही. कृपया दिशाभूल करु नका, धन्यवाद."


या ट्वीटनंतर मधू किश्वर यांनी रितेशची माफीही मागितली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, मुंबईतील माझ्या विश्वासू मित्राने ही माहिती पाठवली होती. तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीबाबतही मी दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित करत नाही. माफ करा, या प्रकरणात माझीच दिशाभूल झाली. यापुढे अशा प्रकरणांमध्ये मी चांगल्या मित्रावरही विश्वास ठेवणार नाही. विनम्र दिलगिरी.

ज्या पद्धतीने रितेशने माझी चूक लक्षात आणून दिली, यामुळे मी प्रभावित झाले. धन्यवाद रितेश देशमुख. तुमच्या एका ट्वीटमुळे अनेक मौल्यवान धडे मिळाले.