Omicron Cases In Mumbai : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात चिंता वाढवली आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून काळजी घेतली जात आहे.  ओमायक्रॉन मुळे झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या ही चिंता अजुनही कायम आहे. सध्या मुंबईत ओमायक्रॉनमुळे गरोदर मातांना होणा-या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बीएमसीकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. 


मुंबईत कोविड बाधित असलेल्या गरोदर मातांना सुरक्षित प्रसुतीकरता मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे. आजपर्यंत तब्बल 1300 कोविड बाधित माताची सुरक्षित प्रसुती मुंबई महापालिका रुग्णालयात करण्यात आली आहे.  मागील दोन वर्षात वयोवृद्ध व्यक्ती,  आणि गरोदर महिला यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका राहीलाय. कोरोनाच्या गेल्या दोन लाटांच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरीयंट हा तुलनेनं कमी घातक ठरतोय, असं तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मात्र, गरोदर मातांना ओमायक्रॉन संसर्गापासून वाचवणं आणि संसर्ग झालाच तर सुरक्षित प्रसुती करणं हे गरजेचं ठरतं. 


महिनाभरात महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 300 कोविड पॉझिटीव्ह महिला सध्या अॅडमिट आहेत. यापैकी 170 डिलीव्हरी झालेत. तर,  कोरोनाकाळात आतापर्यंत महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 1300 कोविड पॉझिटीव्ह गर्भवती महिलांची प्रसुती करण्यात आली आहे.  ओमायक्रॉन व्हेरीयंट जरी  डेल्टाच्या तुलनेत कमी घातक ठरत असला तरी ताप,सर्दी, खोकल्यानं रुग्ण बेजार आहेत. अश्यावेळी गरोदर महिलांनी विशेष काळजी घेणं आणि संसर्गापासून स्वत:ला दूर ठेवणं गरजेचं आहे.


सुरुवातीच्या काळात गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत अनेक संभ्रम होते. आता काही अंशी हे संभ्रम  दूर होऊन गरोदर महिला आणि मातांचं लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, सध्याच्या काळात जन्माला येणारी नवी पिढी ही भविष्यात कोरोना काळात जन्मलेली पिढी म्हणून ओळखली जाईल. नव्या पिढीला सुदृढ आणि सशक्त बनवायचं असेल तर जन्म देणा-या मातेलाही या संकट काळात जपायलाच हवं.