Mahatma Gandhi on indian currency note : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मीचं चित्रही हवं. इंडोनेशिया मुस्लिम देश तरी त्यांच्या चलनावर श्रीगणेशाचं चित्र आहे. भारतात याला कुणीही विरोध करणार नाही, असं केजरीवालांनी म्हटल्यानं पुन्हा नोटांची आणि त्यावरील चित्र अर्थात प्रतिमांची चर्चा सुरु झालीय.  भारतीय संस्कृती आणि वारसा भारतीय चलनावर, नोटेवर पाहायला मिळतो.  देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या देशोदेशीच्या नेत्यांच्या प्रतिमा त्यांच्या चलनावर आहेत.


चीनच्या चलनावर माओ झेडाँग, पाकिस्तानच्या चलनावर मोहम्मद अली जीना आणि भारताच्या चलनावर महात्मा गांधींची प्रतिमा आहे.  भारतीय रिझर्व बँकेनं आजवर नोटेच्या तीन सीरिज चलनात आणल्या आहेत. लायन कॅपिटल सीरिज 1949, महात्मा गांधी सीरिज 1996 आणि गांधींचीच नवी सीरिज 2016 ला आरबीआयनं आणलीय. कोणार्कचं सूर्यमंदिर आणि हंपीतील कलाकृतीही भारतीय चलनावर पाहायला मिळाल्यात.


स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश राजे जॉर्ज सहावे यांची प्रतिमा भारतीय चलनावर होती. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ती प्रतिमा बदलण्यात आली. रिझर्व बँकेच्या म्युझियमच्या रेकॉर्डनुसार गांधींचीच प्रतिमा पहिल्यांदा चलनावर येणार होती.  मात्र तत्कालीन कमिटीचा अंतिम निर्णय सारनाथच्या सिंहाच्या प्रतिमेच्या बाजूनं गेला. लायन कॅपिटल सीरिजनंतर स्वाभाविकपणे गांधींच्या प्रतिमेसह चलन बाजारात आणलं गेलं. लायन कॅपिटल म्हणजे सारनाथ येथील सम्राट अशोकाचा स्तंभ किंवा चतु:सिंहाची मुद्रा असलेला अशोक स्तंभ म्हणतात, रिझर्व बँकेने पहिली भारतीय नोट जारी केली तेव्हा त्याला राजमुद्रेचा दर्जा मिळालेला नव्हता. महात्मा गांधींसह इतर कुठल्याही व्यक्तीची प्रतिमा चलनावर का आणली गेली नाही याबाबत फारच तोकडी स्पष्टीकरणं उपलब्ध आहेत.


 2014 मध्ये एका भाषणात रघुराम राजन यांनी त्यावर भाष्य केलं होतं, शास्त्रज्ञ होमी भाभा किंवा रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा नोटेवर का नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राजन यांनी अनेक भारतीयांनी देशासाठी मोठं काम केलंय, मात्र गांधी त्यात सर्वोच्च आहेत असं उत्तर दिलं होतं. तसंच अनेक थोर भारतीय व्यक्तीमत्व आहेत ज्यांच्या प्रतिमा नोटेवर येऊ शकतात, मात्र त्यातला कुणाहीबद्दल कुठलातरी वाद उद्भवू शकतो असं राजन म्हणाले होते


 2014 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व बँकेच्या समितीनं गांधींऐवजी इतर कुणाचीही प्रतिमा नोटेवर छापण्याच्या सूचनेस नकार दिल्याचं लोकसभेत सांगितलं होतं.


नोटांवर केवळ गांधीजीच का?
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधित्व करतो.


1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात
मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असं नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. 1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं. त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.


नोटांवरील गांधीजींचा फोटो नेमका कुठला?
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.


ही बातमी देखील वाचा-  RBI On Currency Notes: नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार का? RBI ने दिली ही महत्वाची माहिती