मुंबई: भारतीय नोटांवर (Currency Note) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी या हिंदू देवतांचा फोटो असावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. देशाचं चलन कमकुवत होत असताना गणेश आणि लक्ष्मीचा फोटो लावल्यावर त्यामध्ये त्यामध्ये सुधारणा होऊ शकते असं केजरीवाल म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा चलनी नोटांवरील गांधींची प्रतिमा चर्चेत आली.
या आधी अनेकांनी चलनी नोटांवर असलेल्या महात्मा गांधींच्या चित्रावर आक्षेप घेतला होता. त्यासाठी शिवाजी महाराजांपासून ते सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली. पण नोटांवर इतर काही निवडक चित्रं लावल्यास त्यावर कोणी आक्षेप घेऊ शकतो, त्यानंतर अनेक मागण्या पुढे येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकार आणि आरबीआयने आतापर्यंत तरी त्यामध्ये काही बदल केला नाही.
चलनी नोटांवर आज जे महात्मा गांधींचं चित्र दिसतंय ते काही स्वातंत्र्यापासून नाही. अलिकडच्या काळात म्हणजे 1996 साली, महात्मा गांधींच्या नोटांची सिरीज चलनात आणण्यात आली. त्या आधी चलनी नोटांमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. भारतीय चलनी नोटांच्या चित्राचा बदल कसा आहे, त्याचा इतिहास काय आहे हे सविस्तर पाहू.
नोटांवर किंग जॉर्जचा फोटो
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय चलनाचे व्यवस्थापन हे ब्रिटिशांच्या हाती होतं. हिल्टन यंग कमिटीच्या शिफारशीवरून 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे व्यवस्थापन करण्यात येत होतं. त्यावेळी ब्रिटनच्या किंग जॉर्जचा फोटो भारतीय नोटांवर छापण्यात यायचा. स्वातंत्र्यानंतर भारतीय चलनाचं व्यवस्थापन हे भारत सरकारच्या हाती आलं. मग भारत सरकारने, 1949 साली सर्वप्रथम एक रुपयाची नवीन नोट चलनात आणली.
महात्मा गांधींच्या चित्राचा विचार, पण सारनाथ येथील अशोक स्तंभ नोटेवर
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर किंग जॉर्जच्या फोटोच्या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो वापरण्यात यावा असा विचार सुरू झाला. पण नंतर हा विचार मागे पडून एक रुपयाच्या नव्या नोटेवर सारनाथ येथील अशोक स्तंभांचा (Lion Capital at Sarnath) फोटो वापरण्यात आला. पण हा बदल फक्त फोटोपुरताच करण्यात आला. बाकीचे डिझाईन हे जुनंच ठेवण्यात आलं.
दहा रुपयांची नोटेतही बदल
एक रुपयाच्या नोटेनंतर 1950 साली दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि 100 रुपयांची नवी नोट छापण्यात आली. त्यावरही किंग जॉर्जचा फोटो बदलण्यात आला आणि त्या ठकाणीही सारनाथ येथील अशोक स्तंभाचा फोटो लावण्यात आला. या नोटांच्या मागील जहाजाचा फोटो तोच ठेवण्यात आला, पण या नोटांच्या रंगामध्ये काहीसा बदल करण्यात आला.
नोटांवर हिंदी भाषेचा वापर
सुरुवातीच्या नोटांवर केवळ इंग्रजीचा वापर करण्यात यायचा. पण 1954 साली पहिल्यांदा या नोटांवर हिंदी भाषेत सौ रुपया, एक हजार रुपया अशा शब्दांची छपाई करण्यात आली. 1954 सालीच 1000, 5000 आणि 10,000 या नोटांची पुन्हा छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1946 साली ब्रिटिशांनी या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 1978 साली या नोटा पुन्हा एकदा चलनातून माघार घेण्यात आल्या.
100 रुपयाच्या नोटेच्या मागे दोन हत्तींचा फोटो लावण्यात आला होता. तर 1000 रुपयाच्या नोटेच्या मागे तंजावरच्या मंदिराची प्रतिमा छापण्यात आली होती.
पाच हजाराच्या नोटेच्या मागे मुंबईचे 'गेट वे ऑफ इंडिया'
सन 1954 साली छापण्यात आलेल्या पाच हजाराच्या नोटेच्या मागे मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाची प्रतिमा छापण्यात आली होती. बाकी सर्व डिझाईन ब्रिटिशकालीन ठेवण्यात आलं. या नोटेचा रंग हिरवा होता आणि त्याच्या मागे हिंदी आणि इंग्रजी आणि इतर सात भाषेतील शब्द छापण्यात आले होते. सध्या 15 लिपींमध्ये नोटेवर माहिती लिहिली जाते.
दहा हजार रुपयाच्या नोटेच्या मागे सारनाथच्या अशोक स्तंभाची प्रतिमा छापण्यात आली होती. ही नोट काळ्या-पिवळसर रंगातील होती आणि तिच्या मागे हिंदी आणि इंग्रजीसोबत सात भाषांमध्ये दहा हजार रुपये असं लिहिण्यात आलं होतं. दोन रुपये आणि पाच रुपयाच्या मागे वाघ, सांबर, हरीण या प्राण्यांचे चित्र छापण्यात आलं होतं.
1975 मध्ये, 100 रुपयांच्या नोटाच्या मागे शेती आणि चहाच्या पानाचे कोलाज छापण्यात आलं. हरितक्रांतीनंतर अन्न उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्याच्या दिशेने भारताच्या कृषी प्रयत्नांचे स्पष्टीकरण देणाऱ्या आकृतिबंधांचं हे कोलाज होतं.
सेवाग्राम आश्रमात बसलेले गांधी पहिल्यांदा नोटेवर
साठच्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था काहीशी दुबळी होती. त्याचा विचार करुन 1967 साली नोटांचा आकार कमी करण्यात आला. 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ दोन, पाच, दहा आणि 100 रुपयांच्या नोटांची एक सिरीज जारी करण्यात आली. या नोटांच्या मागे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात बसलेले गांधी चित्रित करण्यात आलं होतं.
1980 मध्ये नोटांचा चेहरामोहरा बदलला
आरबीआयकडून 1980 च्या दशकात नोटांचा पूर्णपणे नवीन संच जारी करण्यात आला. या नोटांवरील समोरच्या बाजूला सारनाथचा अशोक स्तंभ कायम ठेवण्यात आला तर मागील बाजूची चित्रं बदलण्यात आली. एका रुपयाच्या नोटेवर ऑईल रिगचं चित्र, दोन रुपयाच्या नोटेवर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, पाच रुपयाच्या नोटेवर शेतीचे यांत्रिकीकरण तर 100 रुपयाच्या नोटेवर हिराकुड धरणाचं चित्र छापण्यात आलं. 10 रुपयांच्या नोटेवर शालीमार बाग आणि मोराचं चित्र तर 20 रुपयांच्या नोटेवर कोर्णार्कचं चक्र छापण्यात आलं.
महात्मा गांधींचे चित्र 1987 साली 500 रुपयांच्या नोटेवर
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 1987 साली 500 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींच्या चित्राची छपाई करण्यात आली. तर सारनाथचा अशोक स्तंभ हा वॉटर मार्क कायम राहिला.
महात्मा गांधींचे चित्र असलेली नोटांची मालिका सुरू
सध्या आपल्या नोटांवर जे महात्मा गांधींचं चित्र दिसतंय ते चित्र पहिल्यांदा 1996 साली छापण्यात आलं. नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा असल्याचं सांगितलं जातंय.
नव्या सिरीजमध्ये 1000 आणि 500 रुपयांची नोट बदललेल्या रंगात जारी केली गेली आणि सुरक्षेचा उपाय म्हणून आतमध्ये रंग बदलणाऱ्या शाईचा वापर करण्यात आला. 2005 साली महात्मा गांधी मालिकेच्या नोटांमध्ये मॅग्नेटिक विंडो सिक्युरिटी थ्रेडचा वापर करण्यात आला. याचं वाचन केवळ मशिनला करता ये
तं.
रुपयाला नवी ओळख (₹) मिळाली
2010 साली रुपयाच्या चिन्हात (₹) बदल करण्यात आला. भारतीय रुपयाला ओळख मिळवून देणारं चिन्ह सादर केलं गेलं. अशा प्रकारे चलनासाठी चिन्ह असलेल्या देशांच्या निवडक यादीमध्ये भारताने स्थान मिळवले. 2011 मध्ये नवीन रुपयाचे चिन्ह बँक नोट आणि नाण्यांमध्ये समाविष्ट केलं गेलं.
जगभरातील मध्यवर्ती बँका बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या प्रमाणित पद्धतीचा अवलंब करतात. भारतात 2005 साली अशा प्रकारची शेवटची उपाययोजना करण्यात आली होती. 2015 मध्ये मोठ्या किमतीच्या नोटांवर ब्लीड लाइन्स आणि एक्सप्लोडिंग नंबर देण्यात आला.
नोटबंदी आणि नव्या नोटा चलनात
नोव्हेंबर 2016 मध्ये महात्मा गांधी मालिकेतील 500 आणि 1,000 रुपये किमतीच्या नोटा चलनातून माघार घेण्यात आल्या. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मूल्यांच्या बँक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती मागे घेतली.
त्यानंतर देशाच्या सांस्कृतिक वारसा आणि वैज्ञानिक कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या महात्मा गांधी मालिकेत नवीन नोटा सादर करण्यात आल्या. वेगवेगळ्या नोटांसाठी वेगळे रंग वापरले गेले आणि नोटांचा आकार कमी केला गेला. आता आपण ज्या नोटा वापरतो त्या सर्वांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात येतं.