मुंबई : दोन विवाह केलेल्या पतीच्या मालमत्तेवर केवळ पहिल्या पत्नीलाच अधिकार मिळतो. मात्र दोन्ही पत्नींच्या मुलांना मालमत्तेतील हिस्सा मिळू शकतो, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आर्थिक रकमेवर त्याच्या दोन पत्नींनी दावा केला आहे.


काय आहे प्रकरण?


महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलात काम करणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. कोविड 19 मुळे या पोलीस कर्मचाऱ्याचा 30 मे रोजी मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कोविड योद्धांच्या वारसांना विशेष मदत जाहीर केली आहे. त्यानुसार सुमारे 65 लाख रुपयांची रक्कम दिवंगत कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. मात्र या रकमेवर दावा दाखल करणारे दोन अर्ज सरकारकडे आले होते.


मृत पोलिसाच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीने या आर्थिक रकमेतील हिस्सा मागण्यासाठी आई आणि स्वतःच्या वतीने याचिका केली आहे. वडील हेच घराचा आधार होते, जर यातली रक्कम मिळाली नाही तर आमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची आबाळ होतील, असा दावा या याचिकेतून केला आहे. राज्य सरकारच्यावतीने सर्व रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली असून न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचे वाटप करावे, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी कोर्टाला सांगितले. तसेच औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या एका निकालानुसार केवळ पहिल्या पत्नीला मालमत्तेत अधिकार असतो, मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांनाही संपत्तीत हिस्सा मिळू शकतो असं स्पष्ट केलं.


कुटुंबियांचे दावे प्रतिदावे


बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये पहिल्या पत्नीची मुलगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर होती. वडिलांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असे तिनं कोर्टाला सांगितलं. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलीने सांगितलं की ती आणि पहिल्या पत्नीची मुलगी या फेसबुकवर एकमेकांना ओळखतात आणि दोघींना त्यांच्या नात्याची माहिती आहे. तसेच दिवंगत पोलीस दुसऱ्या पत्नीसह धारावीतील रेल्वे वसाहतीमध्ये राहत होता, असा दावा याचिकादारांनी कोर्टात केला. त्यावर गुरूवारी होणाऱ्या पुढील सुनावणीला पहिली पत्नी आणि तिच्या मुलीने याबाबत खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.