मुंबई: गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील उकाडा प्रचंड वाढला आहे. मध्यंतरी या संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसानंतर वातावरणातील आर्द्रता (humidity) वाढत गेल्याने मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाड्याचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची मुंबईकर (Mumbai) असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना घामाच्या धारांनी चिंब होत दिवस कंठत राहावे लागणार आहे.


प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढणा नसले तरी  सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नाही.  सोमवारी मतदानाच्या दिवशीही मुंबईकरांना 33 ते 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाशी सामना करावा लागेल. येत्या तीन दिवसांमध्ये मुंबईमध्ये कोरडे वातावरण असू शकेल. त्यामुळे सूर्याची किरणे थेट पोहोचून अधिक चटके जाणवतील. पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्येही सोमवारी कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे. महामुंबई परिसरासोबतच धुळे, दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघांमध्येही सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघातही वातावरण कोरडे असू शकेल असा अंदाज आहे. परिणामी वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास कायम राहणार आहे.


आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, 31 मे रोजी केरळात


भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता मान्सून 31 मे रोजी भारतात दाखल होईल. त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर दोन दिवसांत म्हणजे 13 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील नागरिकांना उकाड्यापासून सुटका होण्यासाठी आणखी किमान 20 दिवस वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे. तत्पूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील.


आणखी वाचा


राज्यात उन्हाची काहिली वाढणार, वेळेआधीच मान्सून पोहोचणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय?