मुंबई : शहापूर तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावर सुमारे 30 ते 35 घर असून 150 ते 200 इतकी लोकवस्ती आहे. या गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही. जंगलातून एक ते दीड किलोमीटर पर्यंत पायपीट करत भातसा कालव्यावर असलेल्या लोखंडी पुलापर्यंत पोहचावे लागते. या पुलाचा उपयोग करुन गावातून बाहेर निघता येते. परंतु हा लोखंडी पूल 40 ते 45 वर्षे जुना असून अतिशय जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा पूल अतिशय धोकादायक झालेला आहे. मात्र असे असतानादेखील येथील शाळकरी मुलं तसेच गावकरी जीव मुठीत धरून याच मोडक्या पुलावरून प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे शाळकरी मुलं ज्यावेळी या पुलावरून प्रवास करतात, त्यावेळी त्यांचे घरात असलेल्या आई-वडिलांच्या मनात धाकधूक सुरु असते. पालकांच्या मनात भीती असते.

गावातून बाहेर निघण्यासाठी एकमेव पूल आहे. पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने नागरिकांची या ठिकाणी गैरसोय होत आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी एक दुसरा मार्ग आहे, परंतु तोही धोक्याचा आहे. त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी वाहत आहे आणि या ओढ्यातून जायचं म्हटलं तर कमरे इतके पाणी साचले आहे. त्यामुळे या गावातील काही विद्यार्थी या ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढतात, तर काही या पुलाचा वापर करून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. भातसाच्या कालव्यावर अनेक असे पूल बांधण्यात आले आहेत मात्र जांभूळपाडा या गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव हा लोखंडी पूल आहे आणि तोही मोडक्या स्थितीत.

जांभूळपाडा आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन या मोडक्या पुलावरुन तसेच कंबरभर पाण्याच्या ओढ्यातून जातात, पाऊसाचा जोर वाढल्यास या ओढ्याच्या पातळीत वाढही होते. शिवाय गावात रस्ता नसल्याने जंगलातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे जंगलात असलेले सर्प, विंचू तसेच हिंसक प्राण्यांचा धोकाही असतो. आवरे गावानजीक एक काँक्रीटचा फुल आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गावात रस्ताच नाहीये जंगलांतून जरी मार्ग काढला तरी जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते.

इथल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील लोकप्रतिनिधींचेही या गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान रस्ता बनवून देण्याचे आश्वासन अनेकदा दिले जाते. परंतु रास्ता काही बनत नाही.

इथल्या रुग्णांचे पावसाळ्यात खूप हाल होत असून एखादा गावकरी आजारी पडल्यास त्यास चादरीची झोळी करुन दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील शहापूर येथे आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागते. यादरम्यान गरोदर महिला दगावण्याची शक्यता आहे.

जांभूळपाडा या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांकरीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवीपर्यंत असून तेथे 24 पटसंख्येसाठी दोन शिक्षक असून रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कधी-कधी त्यांना घरापर्यंत पोहोचवावे लागते. तसेच येथील शिक्षकांनासुद्धा दररोज पाण्यातून किंवा या पुलावरून जीव धोक्यात घालून घरी जावे लागते.